ओएनजीसीच्या विहिरीतून वायुगळती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:15 IST2026-01-06T09:15:36+5:302026-01-06T09:15:51+5:30
मोरी-५ ही विहीर दुर्गम भागात असून तिच्यापासून सुमारे ६०० मीटरच्या परिघात कोणतीही मानवी वस्ती नाही.

ओएनजीसीच्या विहिरीतून वायुगळती
मोरी : आंध्र प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील मोरी येथे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओएनजीसी) मोरी–५ विहिरीत वायुगळती होऊन सोमवारी भीषण आग लागली. उत्पादन वाढीच्या कामादरम्यान ही घटना घडली. या घटनेत कोणाचाही मृत्यू किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव चार किलोमीटर परिसरातील इरुसुमंदा आणि लक्कावरम ही दोन गावे रिकामी करण्यात आली. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले. ओएनजीसीनेही आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात केली आहेत.
वायुगळतीनंतर परिसर केला सील
मोरी-५ ही विहीर दुर्गम भागात असून तिच्यापासून सुमारे ६०० मीटरच्या परिघात कोणतीही मानवी वस्ती नाही. हा सारा परिसर सील करण्यात आला आहे. ही आग विझविण्यासाठी उपाययोजनांबाबत ओएनजीसीने या विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. (वृत्तसंस्था)