गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर काही मिनिटांमध्येच भीषण अपघात झाला होता. या अपघातात विमानामधील प्रवासी, कर्मचारी आणि हे विमान जिथे कोसळले त्या परिसरातील काही लोकांसह मिळून सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ड्रिमलायनर विमानाला हा अपघात कसा झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच तपासामधून अपघाताच्या कारणांबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. दरम्यान, अमेरिकन प्रसारमाध्यमातील एका वृत्तामधून एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या विमानाने अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते. त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळलं.
दरम्यान, या विमान अपघाताबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये ड्रिमलायनर विमानामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष आढळून आलेला नाही. दरम्यान, या वृत्तामधून जो स्विच बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्याचा वापर हा वैमानिकांकडून इंजिन चालू, बंद करण्यासाठी आणि कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगामध्ये केला जातो. भारतामध्ये विमान अपघात तपास संस्थेचा अहवाल समोर येण्यापूर्वीच अमेरिकेमधून ही माहिती समोर आली आहे.
या अपघाताबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासामधून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर सांगितले की, या अपघाताचा तपास वैमानिकांनी केलेल्या कृतीवर केंद्रित आहे. वॉल स्ट्रिट जर्नलने या अपघाताचा तपास करणाऱ्या काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, प्राथमिक तपासामधून या विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधनाचा पुरवठा करणाऱ्या प्रवाहाला नियंत्रित करणारे स्विच बंद करण्यात आले होते, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विमानाने उड्डाण करताच एवढा मोठा अपघात घडला. या अपघाताबाबत माहित घेत असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कॉकपीटमध्ये इंजिनाच्या कंट्रोल स्वीचच्या हालचालीवर तपास केंद्रित राहिला आहे. तसेच विमानाच्या इंजिनांना इंधनाचा पुरवठा करणारे स्विच बंद होते, असे प्राथमिक तपासामधून दिसून येत आहे.