विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:16 IST2025-07-14T19:15:26+5:302025-07-14T19:16:39+5:30
Air India Accident: अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
Air India Accident: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमानअपघाताबाबत AAIB चा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एक सर्व विमान कंपन्यांसाठी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे.
DGCA ने सर्व भारतीय नोंदणीकृत विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश जारी केले आहेत. तपास पूर्ण करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२५ असेल. DGCA ने स्पष्ट केले की, स्टेट ऑफ डिझाईन/मॅन्युफॅक्चरने जारी केलेल्या एअरवॉर्दिनेस निर्देशांच्या आधारे ही तपासणी आवश्यक आहे. हा नियम भारतात नोंदणीकृत सर्व विमानांसाठी आहे.
आदेशात म्हटले की, "DGCA च्या निदर्शनास आले आहे की, SAIB नुसार अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ऑपरेटर्सनी त्यांच्या विमानांची तपासणी सुरू केली आहे. सर्व एअरलाइन ऑपरेटर्सना २१ जुलै २०२५ पर्यंत तपासणी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तपासणीनंतर, अहवाल संबंधित प्रादेशिक कार्यालयाला सादर करावा लागेल."
दरम्यान, गेल्या महिन्यात अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या चौकशीत सुरुवातीचा अहवाल आल्यानंतर जगभरातील प्रमुख विमान कंपन्यांनी बोईंग ७८७ विमानाच्या इंधन स्विचमधील लॉकिंग यंत्रणेची तपासणी सुरू केली आहे. अहवालांनंतर, एतिहाद एअरवेजनेही त्यांच्या अभियंत्यांना बी-७८७ फ्लाइटवरील स्विचेसची लॉकिंग यंत्रणा तपासण्यास सांगितले आहे. इतर विमान कंपन्यांनीही अशीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे किंवा करण्याची योजना आखत आहेत.