'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:13 IST2025-07-23T18:12:26+5:302025-07-23T18:13:09+5:30
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २६९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता.

'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच, पाठवण्यात आलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेह चुकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. लंडनमधील पीडित कुटुंबांचे काम पाहणाऱ्या वकिलांनी हा दावा केला आहे. लंडनमध्ये जेव्हा हे मृतदेह तपासण्यात आले, तेव्हा ते दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले. अद्याप या प्रकरणात एअर इंडियाकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात क्रू मेंबर्स आणि इतरांसह २६९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले. त्यानंतर डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आणि मृतदेह संबंधित कुटुंबांकडे पाठवण्यात आले. लंडनमध्ये या मृतदेहांची पुन्हा तपासणी करण्यात आली. मात्र, आता यातील १२ चुकीचे मृतदेह तिकडे गेल्याचा दावा केला जातोय. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर अनेक कुटुंबांनी अंत्यसंस्कार कार्यक्रम रद्द केला.
१२ मृतदेहांचे अवशेष परत पाठवले
अपघातातील पीडितांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारे वकील जेम्स हीली प्रॅट यांनी डेली मेलला सांगितले की, किमान १२ ब्रिटिश नागरिकांचे अवशेष परत पाठवण्यात आले आहेत. मी एका महिन्यापासून या ब्रिटिश कुटुंबांच्या संपर्कात आहे. या लोकांना फक्त त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. यापैकी अनेकांना अद्याप त्यांच्या प्रियजनांचे अवशेषही मिळालेले नाहीत. काही लोकांना मृतदेह मिळाले, पण ते त्यांच्या प्रियजनांचे नाहीत. हा एक गंभीर निष्काळजीपणा आहे. याबाबत स्पष्टीकरण मिळायला हवे. त्यांनी आशा व्यक्त केली की, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर ब्रिटन दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा मुद्दा नक्कीच उपस्थित करतील.
Our response to media queries regarding a report in the Daily Mail on the Air India crash⬇️
— Randhir Jaiswal (@MEAIndia) July 23, 2025
🔗 https://t.co/pTWIIMSBhipic.twitter.com/IP9QgLNuz7
भारताने काय म्हटले ?
या विषयावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, अहमदाबादमधील दुःखद अपघातानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल आणि तांत्रिक आवश्यकतांनुसार पीडितांची ओळख पटवली होती. सर्व मृतदेह व्यवस्थित घेऊन हाताळण्यात आले. मात्र, आता ब्रिटिश कुटुंबांकडून करण्यात आलेल्या दाव्याची माहिती मिळाली आहे. आम्ही हा अहवालही पाहिला असून, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. लवकरच या समस्येचे निराकरण केले जाईल.