होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:21 IST2025-06-13T09:18:41+5:302025-06-13T09:21:11+5:30
Ahmedabad Plane Crash, Air India: गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेत तब्बल २६५ जणांचा मृत्यू

होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
Ahmedabad Plane Crash, Air India: गुरुवारचा दिवस हा भारतासाठी आणि अनेक कुटुंबांसाठी काळा दिवस ठरला. दुपारी दीडच्या सुमारास अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान टेकऑफ घेतल्यावर लगेचच कोसळले. विमान एक मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. त्यामुळे विमानातील प्रवासी आणि हॉस्टेलमध्ये तेव्हा उपस्थित असलेले लोक यांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अकोला भागातील एका जोडप्याचाही मृत्यू झाला. अपघातात जीव गमावलेले नीरज लवानिया आणि त्यांची पत्नी लंडनला निघाले होते. नीरज वडोदराच्या फेदर स्काय विलास कॉलनीत आपल्या कुटुंबासह राहत होते आणि एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते.
भावाला शेवटचा फोन केला...
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजता नीरजने त्याचा भाऊ सतीशला फोन करून तो टॅक्सीने विमानतळावर निघाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंब त्याच्याशी संपर्क साधू शकले नाही. अपघाताची बातमी मिळताच कुटुंबात आणि गावात शोककळा पसरली. कुटुंबातील सदस्य हेल्पलाइन नंबरवर सतत संपर्क साधत आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. साऱ्यांच्याच कुटुंबातील सदस्य विमानतळावर रडत आहेत. त्यांच्या प्रियजनांना शोधत आहेत. अपघातानंतर तेथे गोंधळाचे वातावरण आहे. अपघाताचे भयानक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
एकूण २६५ जणांचा मृत्यू
अहमदाबाद, गुजरात येथून गॅटविक, लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान एआय-१७१ गुरुवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. उपायुक्तांनी याची पुष्टी केली आहे. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४२ जण होते. त्यापैकी 11A या सीटवर बसलेला एकमेव माणूस अपघातात बचावला. बाकी सर्वजण मरण पावले.