Agriculture : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती, उष्णतेची लाट पिकांवर परिणाम करू शकते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:39 IST2022-03-21T14:38:55+5:302022-03-21T14:39:28+5:30
Heat Wave : उष्णतेच्या लाटेचा परिणाम सामान्य जनजीवनावरच नव्हे तर कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे.

Agriculture : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती, उष्णतेची लाट पिकांवर परिणाम करू शकते...
नवी दिल्ली : साधारणत: मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) परिणाम सध्या दिसून येत आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा अचानक 6 ते 8 अंश सेल्सिअसने वाढला असून, त्यामुळे देशभरात उष्णतेची लाट (Summer 2022) पसरली आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम सामान्य जनजीवनावरच नव्हे तर कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे. उच्च तापमानाचा रब्बी पिकांच्या (Rabi Crops) उत्पन्नावर वाईट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काढणीसाठी तयार असलेल्या पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
यावेळी, देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर तापमानात अचानक 6 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत यंदा उष्णतेच्या लाटेने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटचा अंदाज आहे की, राजस्थानच्या पश्चिम भागावर प्रतिचक्रवात अस्तित्वात आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. येत्या 24 तासांत तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता असून त्यामुळे अनेक भागांतून उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असल्याचे एजन्सीचे मत आहे.
दुसरीकडे, कृषी तज्ज्ञांनीही उष्ण हवामानाबाबत आपल्या अंदाजात म्हटले आहे की, उच्च तापमान एक-दोन आठवडे कायम राहिल्यास उत्तर भारतातील पिकांवर (North India) त्याचा वाईट परिणाम होईल. या हवामानाचा पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याचबरोबर, तीव्र उष्णतेमुळे गडगडाटी वादळे, गारपीट किंवा धुळीचे वादळ यासारख्या तीव्र मान्सूनपूर्व घडामोडी घडू शकतात. या घडामोडींमुळे कापणीसाठी तयार असलेल्या पिकांचेही नुकसान होऊ शकते.