Agneepath Protest: अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 00:51 IST2022-06-20T00:06:14+5:302022-06-20T00:51:54+5:30
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टिकरी बॉर्डर, सिंधू बॉर्डर, अप्सरा बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि बदरपूर बॉर्डरवरील सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे.

Agneepath Protest: अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा
अग्निपथ सैन्य भरती योजनेविरोधात संपूर्ण देशात निदर्शने होताना दिसत आहेत. यातच, दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेविरोधात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर दिल्लीकडे कूच करू शकतात. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सोमवारी सकाळी सील केल्या जाऊ शकतात.
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टिकरी बॉर्डर, सिंधू बॉर्डर, अप्सरा बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि बदरपूर बॉर्डरवरील सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. अग्निपथ सेन्य भरतीविरोधात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर्स दिल्लीच्या दिशेने कूच करू शकतात, अशा प्रकारचे इनपुट्स दिल्ली पोलिसांना मिळाले आहेत.
राकेश टिकैत यांनीही केलाय विरोध -
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही अग्निपथ योजनेविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत गुरुवारी (18 जून, 2022), सशस्त्र दलातील भरतीसाठीच्या केंद्राच्या 'अग्निपथ' योजनेचा विरोध करत म्हणाले, ही योजना थांबवण्यासाठी एका देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता आहे. देशाला आणखी एका मोठ्या आंदोलनाची आवश्यकता आहे.
काय म्हणाले टिकैत? -
टिकैत म्हणाले, आतापर्यंत तरुणांना सशस्त्र दलात किमान १५ वर्षे सेवा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळत होती. मात्र ही योजना लागू झाल्यास सैनिक सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर पेन्शनशिवाय घरी परततील. एवढेच नाही, तर याच पद्धतीने आमदार आणि खासदारांसाठीही निवडणूक लढविण्यासंदर्भात कायदा करावा, असेही टिकैत म्हणाले. अग्निपथ योजना थांबविण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे, यावरही त्यांनी भर दिला.
चार लाख ट्रॅक्टर तयार आहेत -
टिकैत म्हणाले, आमदार आणि खासदार वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत निवडणूक लढवू शकतात आणि पेन्शनही घेऊ शकतात. पण, तरुणांवर चार वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती लादणे अन्यायकारक आहे. आम्ही असे होऊ देणार नाही. ते म्हणाले, बीकेयू अग्निपथ योजने विरोधात आंदोलन करेल. कृषी कायदे परत घेतल्यासंदर्भात ते म्हणाले, की शेतकऱ्यांनी दिल्लीचा रस्ता बघितला आहे आणि चार लाख ट्रॅक्टर तयार आहेत. देशात आता या मुद्द्यावर एका मोठ्या आंदोलनाची आवश्यकता आहे.