१२ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ‘पोक्सो’ आरोपीची फाशी रद्द! सुप्रीम कोर्टाने केली ठाण्यातील वॉचमनची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:48 IST2025-05-20T14:47:10+5:302025-05-20T14:48:00+5:30
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याला पूर्णपणे निर्दोषमुक्त करत त्याची फाशीची शिक्षा रद्द केली.

१२ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ‘पोक्सो’ आरोपीची फाशी रद्द! सुप्रीम कोर्टाने केली ठाण्यातील वॉचमनची निर्दोष मुक्तता
ठाणे : तीन वर्षे नऊ महिन्यांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार करून हत्या केल्याच्या गुन्ह्यासाठी मृत्युदंडाची शिक्षा झालेला रामकिरत मुनीलाल गौड हा ठाण्यातील वॉचमन साडेबारा वर्षे तुरुंगात खितपत होता. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याला पूर्णपणे निर्दोषमुक्त करत त्याची फाशीची शिक्षा रद्द केली.
वंजारी चाळ, जुने वाघबीळ गाव, लक्ष्मीनगर, ठाणे (प.) येथे ही मुलगी राहायची. घरात एकटीच असताना घराबाहेर खेळत असताना ३० सप्टेंबर २०१३ रोजी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर दोन दिवसांनी तिचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह घरापासून एक किमीवर पाण्याच्या एका डबक्यात सापडला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी ३ सप्टेंबरला आरोपी रामकिरतला अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगातच होता.
आधी सहायक पोलिस निरीक्षक विकास लोकरे आणि नंतर पोलिस उपअधीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी केलेल्या तपासाच्या आधारे रामकिरतविरुद्ध ‘पोक्सो’ विशेष न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने ८ मार्च,२०१९ रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर,२०२१ रोजी फाशीवर शिक्कामोर्तब केले. याविरुद्ध रामकिरतने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
आरोपीला पीडित मुलीसोबत पाहिल्याच्या तीन साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी, मुलीचा मृतदेह सापडलेल्या डबक्यातील चिखल आणि आरोपीच्या चपलेला लागलेला चिखल यांच्यातील साधर्म्य, तसेच आरोपीने अनिल महातम सिंग या त्याच्या मुकादमाकडे दिलेली गुन्ह्याची कथित कबुली, हे खालच्या दोन्ही न्यायालयांनी गुन्हासिद्धी व शिक्षेसाठी ग्राह्य धरलेले पुरावे सर्वोच्च न्यायालयाने तकलादू आणि अविश्वसनीय ठरविले.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
थातूरमातूर तपास आणि त्यामुळे अपयशी ठरलेला अभियोग यांचे हे प्रकरण म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे, असा अभिप्राय सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात नोंदविला.
तपास ढिसाळ असूनही न्याय करण्यासाठी कोणाला तरी दोषी धरण्याच्या अतिउत्साहात आधी ‘पोक्सो’ न्यायालयाने आणि नंतर उच्च न्यायालयाने चुकीचे निकाल दिले, असे ताशेरेही ओढले.
या सर्वांचा परिणाम म्हणून आरोपीला १२ वर्षे व त्यातील सहा वर्षे फाशीची टांगती तलवार डोक्यावर घेऊन तुरुंगात काढावी लागली, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त केली.