Narendra Modi : "TMC सरकार जाण्याचा काउंटडाऊन सुरू..."; कोलकात्यात मोदी कडाडले, ममता बॅनर्जींवरही टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:17 IST2026-03-14T17:16:45+5:302026-03-14T17:17:17+5:30
Narendra Modi And Mamata Banerjee : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यात कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राऊंडवर जनतेला संबोधित केलं.

Narendra Modi : "TMC सरकार जाण्याचा काउंटडाऊन सुरू..."; कोलकात्यात मोदी कडाडले, ममता बॅनर्जींवरही टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यात कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राऊंडवर जनतेला संबोधित केलं. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कोलकात्याच्या रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, टीएमसीचे लोक जनतेला धमकावत आहेत, कारण बंगालच्या जनतेने टीएमसीची गुंडगिरी संपवण्याचा निर्धार केला आहे, हे त्यांना समजलं आहे. पश्चिम बंगालच्या ज्वलंत समस्या एकामागून एक मांडत आगामी निवडणुकीच्या निकालात भाजपाचे सरकार स्थापन होईल असा दावा मोदींनी केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "ममता सरकारच्या काळात बंगालमधील रोजगाराच्या संधी संपल्या आहेत. राज्य सरकारच्या अपयशामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे स्थलांतर वाढलं आहे. नवीन गुंतवणूकदार बंगालमध्ये उद्योग सुरू करण्यास घाबरत आहेत. तरुणांना नोकरीसाठी इतर राज्यांकडे वळावं लागत आहे. मी बंगालच्या बंधू-भगिनींना विश्वास देऊ इच्छितो की, पश्चिम बंगालमध्ये येणारे भाजपा सरकार राज्याच्या विकासासाठी पूर्ण ताकद लावेल. आमच्या डबल इंजिन सरकारमुळे पश्चिम बंगालचा विकास होईल."
Speaking at a massive BJP rally in Kolkata. Across West Bengal, people are rising in anger against TMC’s corruption, cut money syndicates, violence and years of misrule.@BJP4Bengalhttps://t.co/Hlv692DsOE
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2026
"बंगालची परिस्थिती बिकट असण्याचे कारण म्हणजे टीएमसी सरकारच्या प्रमुख ममता दीदींनी केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांसाठी बंगालचे दरवाजे बंद केले आहेत. टीएमसी सरकारची गुंडगिरी आता संपणार आहे. टीएमसीने भारताच्या संविधानाचा अपमान केला असून ते आदिवासींचाही अपमान करतात. म्हणूनच बंगालमधून टीएमसी सरकारची पाठवणी होणार आहे. ममता दीदींच्या सरकार जाण्याचा काउंटडाऊन सुरू झाला आहे."
"ममता सरकारने केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ तुम्हा लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही. टीएमसी सत्तेतून गेल्यास, बंगालच्या जनतेला 'पंतप्रधान आवास योजना' आणि इतर अनेक योजनांचा लाभ मिळेल. टीएमसीचे लोक माफियांना राजाश्रय देतात. भाजपाच्या सरकारमध्ये जनतेच्या हक्कावर दरोडा टाकणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. बंगालमध्ये तपास यंत्रणांना काम करण्यापासून रोखलं जातं आणि भ्रष्ट नेत्यांना वाचवलं जातं. जनतेने आता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानात उसळलेली ही गर्दी पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार येणार असल्याचे संकेत देत आहे."
कोलकाता रॅलीच्या व्यासपीठावरून टीएमसी सरकारला आव्हान देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "भाजपाच पश्चिम बंगालचे नवनिर्माण करेल. गरिबांना घरं देईल आणि उद्योग उभारून लोकांना त्यांच्याच शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. टीएमसीने लोकांना भ्रमित केलं, मात्र आता जनतेला त्यांचं सत्य समजलं आहे. त्यामुळेच विकासासाठी जनता भाजपा सरकारला निवडून देईल."