पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:14 IST2025-10-31T10:14:32+5:302025-10-31T10:14:59+5:30
यासंदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, हेरात प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अशा मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत राहील.

पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
अफगाणिस्ताननेपाकिस्तानच्या दिशेने वाहणाऱ्या कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचा हा निर्णय पाकिस्तानचे टेन्शन वाढवणारा आहे. महत्वाचे म्हणजे, अफगाणिस्तानच्या या निर्णयाला भारतानेही उघड उघड समर्थन दिले आहे. आपण अफगाणिस्तानच्या जलविद्युत प्रकल्पांसह शाश्वत जलव्यवस्थापनासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत, असे भारताने म्हटले आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पुन्हा एकदा अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेप्रती वचनबद्धता दर्शवली आहे. 
यासंदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, हेरात प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अशा मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत राहील.
अफगाणिस्तानने गेल्या आठवड्यातच पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात वाहणाऱ्या कुनार नदीवर धरण बांधण्याची घोषणा केली आहे. असे झाल्यास, पाकिस्तानात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर मर्यादा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलीकडेच भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जलसंधी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता यामुळेही पाकिस्तानचे टेन्शन वाढणार आहे.
यावेळी भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या सैन्य तणावात अफगाणिस्तानला समर्थन देत, पाकिस्तानकडून दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या समर्थनावर चिंता व्यक्त केली. जायसवाल म्हणाले, अफगाणिस्तान आपल्या हद्दीत सार्वभौमत्वाचा प्रयोग करत आहे, म्हणून पाकिस्तान नाराज आहे. भारत अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
कुनार नदी कुठून कुठे वाहते? -
कुनार नदी अंदाजे 480 किलोमीटर लांबीची असून ती अफगाणिस्तानच्या पूर्वेकडून पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात वाहते. ही नदी हिंदूकुश पर्वतरांगांतून आणि अफगाणिस्तानातील वरच्या कुनार खोऱ्यातून दक्षिणेकडे वाहते.