अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 07:05 IST2025-10-13T07:04:38+5:302025-10-13T07:05:15+5:30
पत्रकारांची यादी मर्यादित होती आणि महिला पत्रकारांचे त्यात नाव नसणे ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरण मुत्ताकी यांनी दिले.

अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
नवी दिल्ली: महिला पत्रकारांना निमंत्रण न दिल्याने वादंगात सापडलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमिर खान मुत्ताकी यांनी रविवारी अफगाण दूतावासात दुसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी अफगाण दूतावासाने महिला पत्रकारांना निमंत्रित केले. त्या वेळी या एकूण प्रकरणावरून महिला पत्रकारांकडून मुत्ताकी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर मुत्ताकी यांनी घाईघाईत पत्रकार परिषद बोलावण्यात आल्याचे सांगत ही केवळ तांत्रिक चूक असल्याचे म्हटले.
पत्रकारांची यादी मर्यादित होती आणि महिला पत्रकारांचे त्यात नाव नसणे ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरण मुत्ताकी यांनी दिले. महिला पत्रकारांना न बोलावण्याचा असा आमचा अजिबात हेतू नव्हता. आमच्या सहकाऱ्यांनी काही पत्रकारांची नावे निश्चित केली होती आणि त्यांनाच बोलावले गेले, असे मुत्ताकी म्हणाले.
आमच्याकडून अत्यंत घाईघाईत पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. आमच्याकडून पुरुष वा महिला पत्रकार, अशा कोणाच्याही अधिकाराचा भंग झाला नाही.
अमिर खान मुत्ताकी, अफगाणिस्तान परराष्ट्रमंत्री