दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:43 IST2025-10-11T05:43:16+5:302025-10-11T05:43:28+5:30
विकासासाठी भारत करणार मदत, टेक्निकल मिशनला दूतावासाचा दर्जा; पाकिस्तानला मोठा इशारा

दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी आमची भूमी कोणालाही वापरू देणार नाही. भारताच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही दहशतवादी गटाला व इसिसला अफगाणिस्तान थारा देणार नाही, असे आश्वासन शुक्रवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुताकी यांनी दिले. मुताकी हे सध्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, शुक्रवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र खात्याचे शिष्टमंडळ व भारताच्या परराष्ट्र खात्याचे शिष्टमंडळ यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली.
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चर्चेत सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी उभय देशांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे जयशंकर म्हणाले. त्यावर मुताकी यांनी सहकार्याचे आश्वासन दिले.
चार वर्षांपूर्वी काय झाले होते?
या चर्चेत भारताच्या अफगाणिस्तानातील टेक्निकल मिशनला दूतावासाचा दर्जा देण्याची, भारत अफगाणिस्तानात पुन्हा विकासकामे करणार असल्याची घोषणा जयशंकर यांनी केली. चार वर्षांपूर्वी तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर भारताने काबूल येथील आपला दूतावास बंद केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये भारताने काबूलमध्ये टेक्निकल मिशन तैनात केले होते.
कोण आहे मेहसूद?
नूर वली मेहसूदचा जन्म २६ जून १९७८ रोजी दक्षिणी वजिरिस्तानच्या गुडगाव भागात झाला. तो पाकिस्तानचा मोस्ट वाँटेड अतिरेक्यांपैकी एक आहे.
तो मुल्ला फजलुल्लाह याच्या मृत्यूनंतर संघटनेचा म्होरक्या झाला. २०१३ मध्ये मेहसूद कराचीत कारवाया घडवून आणत होता.
संपूर्ण पाकिस्तानमध्ये अतिरेकी हल्ले घडवून आणण्यासाठी लागणारे पैसे उभारताना अपहरण व खंडणी वसुलीचे नेटवर्क तो उभे करीत होता. कराचीमधील वाद तालिबानच्या न्यायालयांत सोडविण्याचे फर्मानही त्याने काढले होते.