“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:24 IST2025-10-08T15:20:35+5:302025-10-08T15:24:11+5:30
Asim Sarode Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत १२ ते १४ नोव्हेंबर असे तीन दिवस युक्तिवाद होऊ शकतो, अशी माहिती असीम सरोदेंनी दिली.

“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
Asim Sarode Supreme Court:शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. परंतु, ही सुनावणी १ महिना पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, असा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकल्यानंतर वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भात माहिती देताना शिवसेना शिंदे गटावर टीका केली.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. साधारणपणे जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील. त्यापूर्वी आम्हाला सुनावणी होणे आवश्य आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकरची तारीख द्यावी, जेणेकरून अंतिम युक्तिवाद पूर्ण होईल अशी मागणी केली. तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून ही तारीख आणखी लांबवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी दोन्ही बाजूचे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी १२ नोव्हेंबरची तारीख दिली.
ठाकरेंची बाजू भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलत आहेत
एकनाथ शिंदे यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी डिसेंबर महिन्यात सुनावणी घ्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. यावर प्रतिक्रिया देताना वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, ज्यांची बाजू कमजोर असते त्यांना काहीतरी न्यायिक क्लुप्त्या करायच्या असतात. संवैधानिक आणि कायद्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू अतिशय भक्कम आहे. त्यामुळे हे प्रकरण जेवढे पुढे ढकलता येईल, तेवढे ढकलावे, असा प्रयत्न प्रतिपक्षाचा दिसत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयासमोर इतर महत्त्वाची प्रकरणे असल्यामुळे अर्धवट सुनावणी ठेवण्यापेक्षा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. १२ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाचा युक्तीवाद सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल पहिल्यांदा युक्तिवाद करतील. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे वकील बाजू मांडतील. १२ ते १४ नोव्हेंबर असे तीन दिवस युक्तिवाद होऊ शकतो, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.