‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 05:21 IST2025-10-05T05:21:25+5:302025-10-05T05:21:45+5:30
तामिळनाडू सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपच्या विक्रीवर १ ऑक्टोबरपासून बंदी घातली असून बाजारातील साठा परत मागवला आहे.

‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
चेन्नई : मध्य प्रदेश व राजस्थानातील मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा संशय असलेल्या तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या (कफ सिरप) नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आली आहे.
तामिळनाडूच्या अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीच्या औषधाच्या नमुन्यांची अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून एका कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली आहे. या कंपनीला कफ सिरपचे उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून स्पष्टीकरण मागवले आहे.
‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी
तामिळनाडू सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपच्या विक्रीवर १ ऑक्टोबरपासून बंदी घातली असून बाजारातील साठा परत मागवला आहे.
मध्य प्रदेशातही ‘कोल्ड्रिफ’वर बंदी
भोपाळ : छिंदवाडा जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून ९ मुलांचे संशयितरीत्या मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या विक्रीवर राज्यभर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कंपनीच्या इतर उत्पादनांवरही कारवाई होणार असल्याचे सांगितले. चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सांगितले की, छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे ७ सप्टेंबरपासून मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या कफ सिरपमध्ये ‘ब्रेक ऑइल सॉल्व्हेंट’ मिसळल्याचा संशय आहे.