'माझ्यासोबत काहीही करा पण सत्य...'; ४१ जणांचा बळी गेल्यानंतर थलापती विजयची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:31 IST2025-09-30T17:17:29+5:302025-09-30T17:31:19+5:30
Thalapathy Vijay karur Stempede : तमिळनाडूत चेंगराचेंगरीनंतर ४१ जणांचा मृत्यू झाल्यावर अभिनेता विजयने प्रतिक्रिया दिली आहे.

'माझ्यासोबत काहीही करा पण सत्य...'; ४१ जणांचा बळी गेल्यानंतर थलापती विजयची पहिली प्रतिक्रिया
Actor Vijay on Tamil Nadu Stampede: तमिलगा वेट्टी कझगम प्रमुख आणि अभिनेता थलापती विजय याच्या निवडणूक रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. विजय पक्षाच्या प्रचारासाठी तामिळनाडूतील करूर येथे आला होता. यावेळी अभिनेत्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. याच गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि अनेकजण मृत्यूमुखी पडले. दुसरी राज्य आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. अशातच अभिनेता विजयने पहिल्यांदाच या भयानक घटनेवर भाष्य केलं. मी कधीही अशी दुःखद घटना पाहिली नव्हती असं विजयने म्हटलं.
२७ सप्टेंबर रोजी टीव्हीके प्रमुख आणि तमिळ स्टार अभिनेता विजय याच्या उपस्थितीत करूर येथे झालेल्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना, विजय यांने एक व्हिडीओ मेसेज जारी केला आहे. विजय अद्याप चेंगराचेंगरीतील पीडितांना भेटलेलो नाही, कारण परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे त्याने व्हिडीओ मेसेजद्वारे या घटनेवर भाष्य केलं. माझ्यावर कारवाई करा पण कार्यकर्त्यांना सोडून द्या असं विजयने सरकारला म्हटलं आहे.
"माझ्या आयुष्यात मी कधीही अशा वेदनादायक आणि भयानक परिस्थितीचा सामना केला नाही. मला खूप वेदना होत आहेत. राजकारण बाजूला ठेवून, आम्ही नेहमीच पोलिसांकडून सुरक्षित जागेसाठी परवानगी मागतो. पण ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्या घडल्या आहेत. मी लवकरच पीडितांना भेटेन. या नुकसानीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबाप्रती मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला विनंती करतो - कृपया माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना इजा पोहोचवू नका. तुम्ही माझ्या घरी किंवा माझ्या कार्यालयात येऊन माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू शकता, पण त्यांच्याविरुद्ध नाही. लवकरच सत्य बाहेर येईल," असं विजयने म्हटलं.
#WATCH | TVK chief and actor Vijay says, "I have never faced such a painful situation in my life. I am in deep pain... Leaving aside all politics, we always request permission from the police for a safe place. But things that shouldn't have happened have happened... I will soon… pic.twitter.com/JcZlg96UH5
— ANI (@ANI) September 30, 2025
दरम्यान, टीव्हीकेने करूर येथे आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अटक केलेल्या पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना मंगळवारी न्यायालयाने रिमांडवर पाठवले. टीव्हीकेचे करूर पश्चिम जिल्हा सचिव व्ही.पी. मथिलागन आणि करूर मध्य जिल्हा सचिव कासी पौनराज यांचे नाव एफआयआरमध्ये आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, टीव्हीकेचे राज्य सरचिटणीस बस्सी आनंद आणि उपसरचिटणीस निर्मल कुमार यांचेही नाव एफआयआरमध्ये आहे, पण त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.