दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 22:28 IST2025-10-26T22:27:39+5:302025-10-26T22:28:58+5:30
Acid Attack News: दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर तरुणांनी ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उत्तर पश्चिम दिल्लीमधील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ घडली. पीडित विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असतानाच आरोपींनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य
दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर तरुणांनी ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उत्तर पश्चिम दिल्लीमधील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ घडली. पीडित विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असतानाच आरोपींनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या हल्ल्यात आपला चेहरा वाचवण्यात ही विद्यार्थिनी यशस्वी ठरली. मात्र या प्रयत्नात तिचे हात जळाले. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जबावाच्या आधारावर गुन्हा नोंदवून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित तरुणीने जाबाबामध्ये सांगितले की, ती दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. तसेच ती क्लाससाठी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये जात होती. ती कॉलेजच्या दिशेने जात असताना तिच्या ओळखीतला जितेंद्र नावाचा तरुण इशान आणि अरमान या मित्रांसोबत दुचाकीवरून आला आणि हल्ला केला.
दरम्यान, जितेंद्रसोबत असलेल्या इशान याने अरमानकडे एक बाटली दिली. तर अमरानने या विद्यार्थिनीवर ॲसिड फेकले, असा आरोप आहे. हल्ला होताच पीडित तरुणीने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिचे दोन्ही हात जळाले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पीडित तरुणीला मदत करत त्वरित रुग्णालयात पोहोचवले. तिच्या हातांना जखमा झाल्या असून, उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
जितेंद्र हा आपला पाठलाग करायचा आणि महिनाभरापूर्वी यावरून त्याच्यासोबत आपलं कडाक्याचं भांडण झालं होतं, असे पीडित तरुणीने आपल्या जबाबात सांगितले. आता पीडित तरुणीचा जबाब आणि तिला झालेल्या जखमांच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.