देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:58 IST2025-11-03T18:53:38+5:302025-11-03T18:58:28+5:30
काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांतून एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत.

देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
Accident News: गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांतून एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. जयपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये झालेल्या अपघातांत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले. वेग, निष्काळजीपणा आणि सुरक्षेचा अभाव हे या अपघातांचे प्रमुख कारण मानले जात आहे.
जयपूरमध्ये डंपरची 17 गाड्यांना धडक : 12 ठार
राजस्थानच्या जयपूरमध्ये सोमवारी दुपारी साडेएकच्या सुमारास डंपरने सलग 17 वाहनांना धडक दिली, ज्यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 18 लोक गंभीर जखमी झाले. हा अपघात रोड नं. 14 वरील पेट्रोलपंपाजवळ झाला. डंपर हायवेवर शिरताना नियंत्रण सुटल्याने समोरच्या वाहनांवर आदळला.
राजस्थानमध्ये खासगी बसला आग : 2 ठार, 10 जखमी
राजस्थानमध्येच काही दिवसांपूर्वी एक भीषण बस दुर्घटना घडली. उत्तर प्रदेशच्या पीलीभीतहून ईंटभट्टीवर जाणाऱ्या 50 मजुरांनी भरलेली बस 11 केव्ही हाय-टेंशन लाईनला धडकली. त्यात बसवरील सिलिंडर आणि दुचाकी वाहनांनी आग पकडली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर दहा जखमी झाले. या घटनेत बस जळून खाक झाली.
फलोदीत टेंपो-ट्रक धडक : 15 ठार
राजस्थानातील फलोदी भागात रविवारी रात्री टेंपो ट्रॅव्हलर आणि ट्रक यांची जोरदार टक्कर झाली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृतक जोधपूरच्या सुरसागर परिसरातील असून ते कोलायत मंदिरात दर्शन करून परत येत होते.
तेलंगणात एसटी बस आणि ट्रकची टक्कर : 20 ठार
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची बस आणि गिट्टीने भरलेला ट्रक यांच्यात धडक होऊन 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 महिला, एक 10 महिन्याचे बाळ आणि दोन्ही वाहन चालकांचा समावेश आहे. ट्रकची गिट्टी बसच्या आत पडल्याने अनेक प्रवासी दबले.
आंध्र प्रदेशात बसला आग : 20 प्रवाशांचा मृत्यू
कुरनूल जिल्ह्यात हैदराबादहून बंगळुरुकडे जाणाऱ्या बसला आग लागून 20 प्रवाशांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत समोर आले की बसखाली मोटारसायकल फसल्याने ठिणगी उडाली आणि संपूर्ण बस पेटली. बसमध्ये 43 प्रवासी होते. फॉरेन्सिक अहवालानुसार, बसची बॅटरी, ज्वलनशील सीट्स आणि प्रवाशांचे मोबाइल फोन यांनी आगीचा प्रसार अधिक वेगाने झाला.