आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 11:52 IST2018-10-27T10:52:55+5:302018-10-27T11:52:03+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा
नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. जर आजच्या तारखेला विधानसभा निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाचा पराभव होईल. तसेच छत्तीसगडमध्येही त्यांच्या हाती निराशा लागण्याची शक्यता असल्याचा दावा एबीपी न्यूज आणि सी वोटर्सने केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश - सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशातील 230 जागांपैकी 119 जागा काँग्रेसला मिळू शकतात. बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 116 जागांच्या तुलनेत काँग्रेसला तीन जागा जास्त मिळतील. राज्यात चौथ्यांदा सत्तेवर येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला 105 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. इतरांच्या खात्यात सहा जागा जातील. मध्य प्रदेशात आजच्या तारखेला निवडणूक झाली तर काँग्रेसला जास्त मतदान होईल अस सर्व्हेत दिसत आहे. काँग्रेसला एकूण 43, भाजपाला 42 आणि इतर पक्षांना 15 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
राजस्थान - विधानसभेच्या एकूण 200 जागांसाठी राजस्थानमध्ये निवडणूक होणार आहे. सर्वेक्षणानुसार, आज निवडणूक होण्याच्या परिस्थितीत काँग्रेस दमदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सर्वात जास्त 144 जागांवर विजय मिळू शकतो तर भाजपाच्या खात्यात फक्त 55 जागा जाण्याची शक्यता आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येईल. मतदान टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसला 49, भाजपाला 37 आणि इतरांना 14 टक्के मतदान होऊ शकतं. राज्यात सध्या वसुंधरा राजे यांच्याविरोधात वारे वाहत असून भाजपादेखील अनेक आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्तीसगड - छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागांसाठी मतदान होणार आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपाची स्थिती तितकी चांगली दिसत नाही. भाजपा गेल्या 15 वर्षांपासून राज्यात सत्तेवर असून चौथा कार्यकाळ सुरु होईल अशी अपेक्षा करत आहे. भाजपा 43, काँग्रेस 42 आणि इतर पक्षांना 5 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ बहुमतासाठी आवश्यक 46 जागा ना भाजपाला मिळत आहेत, ना काँग्रेसला. सर्व्हेक्षणानुसार भाजपाला 40.1 टक्के, काँग्रेसला 40 टक्के आणि इतरांना 19.9 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.