इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:13 IST2025-12-05T13:11:23+5:302025-12-05T13:13:02+5:30
लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यावर नवरदेवाने आपल्या भावी पत्नीला फोन लावला, पण तिने कॉल कट केला. काही वेळाने त्याने पुन्हा प्रयत्न केला तर..

AI Generated Image
सोशल मीडियावरील आभासी दुनियेतील प्रेम कधीकधी किती मोठा धोका देऊ शकते, याचा अनुभव उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका तरुणाला आला आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघांनी लग्नाची तारीखही ठरवली. त्यानुसार नवरदेव मोठ्या उत्साहाने बँड-बाजा घेऊन वरात घेऊन पोहोचला, पण ऐन लग्नाच्या वेळी वधूने आपला मोबाईल फोन थेट स्विच ऑफ केला. तासन्तास वाट पाहूनही संपर्क न झाल्याने, या तरुणाला नवरीशिवाय रिकाम्या हाताने वरात घेऊन घरी परतण्याची नामुष्की सहन करावी लागली.
सहारनपूरच्या बडगाव भागातील एका गावात राहणाऱ्या या तरुणाची ओळख एका युवतीसोबत इन्स्टाग्रामवर झाली. त्यांच्यात बोलणे सुरू झाले आणि लवकरच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. फोनवर बोलून दोघांनी २ डिसेंबर ही लग्नाची तारीख निश्चित केली. नवरदेवाने आपल्या कुटुंबीयांना या प्रेमाबद्दल सांगितले आणि कुटुंबीयही लग्नाच्या तयारीला लागले. घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाआधीच्या पारंपरिक विधीही पूर्ण झाल्या. नवरदेव सजून-धजून घोड्यावर स्वार झाला आणि बँड-बाजासह वरात घेऊन देवबंद रेल्वे स्टेशनजवळ पोहोचला.
वरात पोहोचताच नवरी गायब!
लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यावर नवरदेवाने आपल्या भावी पत्नीला फोन लावला, पण तिने कॉल कट केला. काही वेळाने त्याने पुन्हा प्रयत्न केला, तेव्हा तिचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. नवरदेवाने अनेक तास वाट पाहिली आणि वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. वधू किंवा तिच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. अखेरीस, अत्यंत निराश होऊन या तरुणाला वरात घेऊन वधू शिवायच घरी परतावे लागले.
हुंड्यात 'ब्रेझा कार'चे आमिष
या घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, युवतीच्या कुटुंबीयांनी हुंड्यात कार देण्याचीही बोलणी केली होती. याच आशेवर काही दिवसांपूर्वी नवरदेव आपल्या मित्रांसोबत सहारनपूर येथील एका शोरूममध्ये गेला होता आणि त्याने 'ब्रेझा कार' पसंतही केली होती. लग्नाचा बेत फिसकटल्यानंतर, या तरुणाला ना नवरी मिळाली, ना हुंड्यातील कार.. त्याच्या हातात केवळ सोशल मीडियावरील या प्रेमाचे आणि स्वप्नभंगाचे दुःखच उरले आहे.