तरुणाने विवाहितेला पळवलं, गावात परतल्यावर दोन कुटुंबात झाली हाणामारी, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:37 IST2025-01-05T15:37:12+5:302025-01-05T15:37:31+5:30
Rajasthan Crime News: राएका तरुणाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत एका पाच वर्षांच्या मुलाचा डोक्याला दगड लागून घटनास्थळावरच मृत्यू झाला.

तरुणाने विवाहितेला पळवलं, गावात परतल्यावर दोन कुटुंबात झाली हाणामारी, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या करौली खालसा गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने विवाहित महिलेला पळवून नेल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत एका पाच वर्षांच्या मुलाचा डोक्याला दगड लागून घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्याशिवाय एक महिला आणि एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. आता या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या वादावादीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी गावातील जसमाल नावाच्या तरुणाने आमच्या घरातील एका सुनेला फूस लावून फळवून नेले होते. त्याच्याविरोदात रामगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता एक दोन दिवसांपूर्वी जसमाल गावात आला तेव्हा कुटुंबीयांनी त्याच्याकडे सुनेूाबत विचारणा केली. त्यावरून जसमालचे कुटुंबीय संतप्त झाले. तसेच त्यांनी भांडण करण्यास सुरुवात केली.
बघता बघता वादावादीचं पर्यावसान हाणामारीत झालं. जसमालच्या कुटुंबातील महिलांसह सर्व व्यक्तींनी लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेकही केली. यादरम्यान, जसमाल, इन्नस आणि अरशद यांनी पाच वर्षांच्या एका मुलावर हल्ला केला. त्यात त्या मुलाच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिला आणि एक मुलगी जखमी झाली.
या घटनेबाबत रामगडचे डीएसपी सुनील कुमार यांनी सांगितले की, करौली खालसा गावामध्ये दोन पक्षांमध्ये भांडण झालं होतं. त्यात पाच वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मारहाण आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू आहे.