दिल्लीत महिला आमदाराला मिळणार मोठी संधी; भाजपामध्ये बैठकांचे सत्र, कोण होणार मुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:39 IST2025-02-10T16:29:12+5:302025-02-10T16:39:32+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे आणि या विजयासह, राजधानीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.

दिल्लीत महिला आमदाराला मिळणार मोठी संधी; भाजपामध्ये बैठकांचे सत्र, कोण होणार मुख्यमंत्री?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आहे. आता राजधानीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, पुढील मुख्यमंत्री भाजप आमदारांमधूनच असेल, अशी माहिती समोर आली आहे. भाजप महिला आमदाराला मुख्यमंत्रिपद देऊ शकते.
यावेळी भाजप दिल्लीत उपमुख्यमंत्री देखील बनवू शकतात. गेल्या काही निवडणुकांनंतरही भाजपमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची संकल्पना दिसून येत आहे. मंत्रिमंडळात महिला आणि दलितांचाही समावेश असेल असं सांगण्यात येत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. दहा वर्षानंतर आपने सत्ता गमावली. या विजयासह, आता दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल या चर्चा सुरू आहेत. भाजपामध्येही बैठकांचे सत्र सुरु आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णय घेण्यासाठी चर्चा सुरू आहेत.
या नावांची जोरदार चर्चा
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून भाजपला मोठा विजय मिळवून दिला. निकालाच्या दिवसापासूनच त्यांचे नाव चर्चेत आहे.
ज्येष्ठ भाजप नेते विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली भाजप प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. आणि ते सातत्याने रोहिणी येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत, २०१५ आणि २०२० मध्ये आपचे वर्चस्व असूनही ते विजयी झाले आहेत. गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले, यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
सतीश उपाध्याय हे भाजपचे ब्राह्मण चेहरा मानले जातात, त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, दिल्ली युवा मोर्चाचे प्रमुख आणि एनडीएमसीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे आणि त्यांनी संघटनेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, ते मध्य प्रदेशचे सह-प्रभारी होते आणि त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.