हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:27 IST2025-12-10T12:22:05+5:302025-12-10T12:27:17+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर कारमध्ये रोमान्स करत असलेल्या एका जोडप्याच्या खाजगी क्षणांचा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजमधून मिळवून रेकॉर्ड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...
उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर कारमध्ये रोमान्स करत असलेल्या एका जोडप्याच्या खाजगी क्षणांचा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजमधून मिळवून रेकॉर्ड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कृत्य दुसऱ्या तिसऱ्या कुणीच नाही तर एटीएमएसमध्ये असिस्टंट मॅनेजर असलेल्या आणि पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर सुरक्षा आणि ट्रॅफिक मॉनिटरिंगची जबबदारी असलेल्या आशुतोश सरकार याने केल्याचं उघडकीस आलं आहे. आशुतोष सरकार याला एक्स्प्रेसवेवरील सीसीटीव्ही फीडपर्यंत पोहोचण्याची मुभा होती. त्यामुळे त्याचा दुरुपयोग करत त्याने प्रवाशांच्या खाजगी क्षणांचं चित्रिकरण मिळवलं आणि ते चित्रित करून त्याचा वापर प्रवाशांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, संबंधित कंपनीने त्याला कामावरून बडतर्फ केलं आहे.
या प्रकरणी सुल्तानपूर जिल्ह्यातील हलियापूर टोला प्लाझाजवळ तैनात असलेल्या एटीएमएसचा असिस्टंट मॅनेजर आशुतोष सरकार याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्याने एक्स्प्रेसवेवरून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या खाजगी क्षणांचं चित्रिकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून रेकॉर्ड केलं. तसेच त्यामाध्यमातून या प्रवाशांना ब्लॅकमेल केलं. एवढंच नाही तर अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
८ डिसेंबर रोजी हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर उघड झाले. तक्रारदारांच्या तक्रारीसह एक व्हिडीओ क्लिप आणि मुख्यमंत्री, सुल्तानपूरचे डीएम आणि एसपी यांना उद्देशून लिहिलेले सविस्तर पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनेक पीडित समोर आले. तसेच त्यांनी पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला. हे प्रकरण अधिकाधिक पेटू लागल्यावर पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद रफ्फान यांनी आशुतोष सरकारविरोधात गुन्हा नोंदवला.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका नवविवाहित दाम्पत्यापासून झाली. ते पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कारमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, या दाम्पत्याने टोल प्लाझापासून काही अंतरावर कार थांबवली. त्यानंतर त्यांनी कारमध्येच रोमान्स करण्यास सुरुवात केली. दरम्यान, महामार्गावर सुरक्षा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला. आशुतोषने ही बाब हेरून त्याचा व्हिडीओ तयार केला. तसेच तो व्हायरल करण्याची धमकी देऊन दाम्पत्याकडून ३२ हजार रुपये उकळले. मात्र पैसे घेतल्यानंतरही आशुतोष याने हा व्हिडीओ व्हायरल केला. या प्रकारामुळे सदर दाम्पत्यास धक्का बसला. त्यांनी या प्रकाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत केली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणखी काही दाम्पत्यांनीही याबाबत पुढे येऊन तक्रार केली.
दरम्यान, हे प्रकरण वाढू लागल्यानंतर एटीएमएसचं मॉनिटरिंग करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आशुतोष याला कामावरून बडतर्फ करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र आशुतोष याने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच माझ्या नोकरीवर जळणाऱ्या काही सहकाऱ्यांनीच कट रचून हे सर्व घडवून आणल्याचा दावा त्याने केला.