१२६ दिवस, ३४ देशांचा थरारक प्रवास... कशासाठी? ग्रामीण भागांतील शाळांसाठी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:06 IST2025-09-28T13:05:46+5:302025-09-28T13:06:24+5:30
इराणमधील युद्धजन्य धडकणारी क्षेपणास्त्रे, इराणच्या पोलिसांनी केलेली अटक, अशा कठीण परिस्थितीतही पुण्याच्या अभिजीत गानू यांनी दुचाकीवरून १२६ दिवसांत ३४ देश पार करत लंडन गाठले.

१२६ दिवस, ३४ देशांचा थरारक प्रवास... कशासाठी? ग्रामीण भागांतील शाळांसाठी!
लोकमत
विशेष वृत्त
इराणमधील युद्धजन्य धडकणारी क्षेपणास्त्रे, इराणच्या पोलिसांनी केलेली अटक, अशा कठीण परिस्थितीतही पुण्याच्या अभिजीत गानू यांनी दुचाकीवरून १२६ दिवसांत ३४ देश पार करत लंडन गाठले. ग्रामीण भागात शाळांच्या मदतीसाठी निधी जमवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना करत हा प्रवास केला.
१९९४ मध्ये अभिजीत यांच्या आईने त्यांना सुझुकी शोगन ही पहिली बाइक भेट दिली, तेव्हापासून त्यांना दुचाकीचे वेड लागले. २००२ मध्ये मोठा अपघात झाल्याने काही वर्षे त्यांनी दुचाकी चालवली नाही. डॉक्टरही त्यांना पुढे चालता येणार नाही, असे म्हणाले होते. परंतु, इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी धावायला सुरुवात केली. २०११ मध्ये त्यांनी हार्ले डेव्हिडसन विकत घेत देशभरात भटकंती केली. त्यानंतर १५ दुचाकी घेत ४.५ लाख किमीचा पल्ला गाठला. २०१७-१८ मध्ये 'भारत-लंडन हा दुचाकी प्रवास करण्याचे ठरले. प्रवासात इराण मार्गाचा शॉर्टकट न घेण्याचे त्यांनी ठरवले. मात्र, दौऱ्याची रेकी करायला २०२३ वर्ष उजाडले. चार मित्रांनी चीन गाठले. याच काळात त्यांनी तिबेट एव्हरेट बेस कॅम्पला दुचाकीवरून भेट दिली. २०२४ मध्ये त्यांना या दौऱ्याची सुरुवात करायची होती; पण शेंजेनचा व्हिसा न मिळाल्यामुळे त्यांना दौरा पुढे ढकलावा लागला. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी अभिजित यांनी पुण्यातून 'होंडा आफ्रिका द्विन' या अकराशे सीसी इंजिन क्षमतेच्या दुचाकीवरून लंडन दौऱ्याला सुरुवात केली. १७ दिवसांत चीन आणि ६ सप्टेंबरला लंडन गाठले.
शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य: अभिजीत गानू
'राउंड टेबल इंडिया' संस्थेमध्ये २००३ पासून अभिजीत गानू हे कार्यरत आहेत. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील वंचित मुलांसाठी वर्गखोल्या बांधून देण्याचे काम आमची ही संस्था करते. पडलेली शाळा, दोनच खोल्यांमध्ये भरणारे आठ वर्ग अशा अनेक समस्या येथे आहेत. या शाळांना मदत मिळावी, यासाठी मी या दौऱ्यातून निधी जमवण्याचा निर्णय घेतला. अभिजीत म्हणाले की, या प्रवासात जगभरातील लोकांनी खूप प्रेम दिले. बॉलीवूड अभिनेत्यांची लोकप्रियता अनुभवली.
इराणमध्ये आला होता बाका प्रसंग
अभिजीत कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान पूर्ण करून १३ जूनला इराणला पोहोचले. १३ जूनलाच इस्रायलने इराणच्या आर्मी कमांडरला मारले. इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. त्यामुळे मशाद येथे ते एका नातेवाइकांकडे राहिले, पण तेथेही ड्रोन, मिसाइल्सचे हल्ले सुरू झाले. त्यानंतर त्यांनी पहाटे तीन वाजता प्रवास सुरू करत एका दिवसात १,६५० किमी दुचाकी चालवली. २३ ते ५४ अंश से. तापमानात सीमारेषेजवळील ताबरीझ गाठले. तेथे १० अंश से. तापमान होते. अर्मेनिया सीमारेषा पार करण्याचा विचार होता. पण इराणच्या १६ ते १७ पोलिसांनी त्यांना गराडा घातला. बॅगेतील छोटा ड्रोन पाहताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चेहरा कपड्याने झाकला. ६ तास चौकशी केली. ड्रोन तेथेच सोडावा लागला. ड्रोन अभिजीत यांच्या नावावर असल्यामुळे त्यांनी एफआयआर लिहून घेतला आणि मित्रांनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.
तब्बल ५४ तास पोटात ना अन्नाचा कण ना झोप
३५ ते ३६ तास त्यांना जेवण, झोप मिळाली नव्हती. त्यानंतर त्यांनी ४५० किमी अंतर आणि १७चेकपोस्ट पार करत अर्मेनिया गाठले. तोपर्यंत रिकाम्या पोटी आणि झोपेविना ५४ तास झाले होते. १०० किमी अंतर पार केल्यानंतर एका बस स्टॉपवर एक बसचालक भेटला आणि त्याने शाहरूख खान, सलमान खान या कलाकारांवर बोलत माझी आई सांस भी कभी बहू थी' मालिका पाहते हे सांगितले. तसेच, अभिजीत यांना आपले घर राहण्यासाठी दिले. अभिजीत यांनी १२६ दिवसांत नेपाळ, चीन, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्की, ग्रीस, बल्गेरिया, नॉर्थ मेसिडोनिया, सर्बिया, माँटेनिग्रो, बोस्निया-हर्जेगोव्हिना, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, चेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, पोलंड, लुथवेनिया, लॅटव्हिया, एस्टोनिया, फिनलैंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, लक्झेंबर्ग, फ्रान्स, ब्रिटन असे ३४ देश पार केले.