नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:05 IST2025-12-25T16:05:08+5:302025-12-25T16:05:25+5:30
Christmas : काही ठिकाणी धार्मिक संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला, तर काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या.

नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
Christmas : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि केरळमधून विरोध प्रदर्शन, तोडफोड आणि झटापटीच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी धार्मिक संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला, तर काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या.
रायपूरमध्ये मॉलमध्ये तोडफोड
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील आमाबेड़ा येथे झालेल्या हिंसाचार आणि कथित धर्मांतराच्या घटनेच्या निषेधार्थ ‘छत्तीसगड सर्व समाजा’ने राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. या बंदचा परिणाम रायपूर, दुर्ग आणि जगदलपूर येथे दिसून आला. याच दरम्यान, राजधानी रायपूरमधील तेलीबांधा परिसरातील मॅग्नेटो मॉल तसेच कटोरा तलाव येथील ब्लिंकिट गोदामात समाजकंटकंकडून तोडफोड करण्यात आली.
आरोपानुसार, आंदोलनादरम्यान मॉलमधील ख्रिसमसची सजावट तोडण्यात आली, आतील मालमत्तेचे नुकसान झाले आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. तेलीबांधा पोलीस ठाण्याचे प्रभारी अविनाश सिंह यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मॉल प्रशासनाने मात्र स्पष्ट केले की, येथे दरवर्षी सर्व धर्मांचे आणि राष्ट्रीय सण साजरे केले जातात आणि ख्रिसमसची सजावट त्याच परंपरेचा भाग होती.
नवी मुंबईत युवकाला मारहाण
महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या दिघा परिसरात एका मोबाईल दुकानात घुसून अर्जुन सिंह या हिंदू युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अर्जुनने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘मला ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ नका’ असे लिहिले होते. यामुळे संतप्त झालेल्या काही जणांनी दुकानाची तोडफोड करत त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडिताचा आरोप आहे की, सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली; मात्र नंतर दोन्ही बाजूंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये चर्चबाहेर आंदोलन
उत्तर प्रदेशातील बरेली येथे ख्रिसमसच्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सेंट अल्फोन्सस कॅथेड्रल चर्चबाहेर आंदोलन केले. यावेळी हनुमान चालीसाचे पठण आणि घोषणाबाजी करण्यात आली. ख्रिसमस कार्यक्रमांमधून हिंदू धर्माची बदनामी होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सिटी सीओंकडे निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली.
दिल्ली, गुरुग्राम आणि हिसारमधील घडामोडी
दिल्लीच्या साकेत भागात ‘यूथ स्टँड्स फॉर सोसायटी’ या संघटनेने तुलसी पूजनाचे आयोजन केले. आयोजकांनी सांगितले की, त्यांना ख्रिसमस साजरा करण्यास विरोध नाही, मात्र पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे हिंदू आपल्या परंपरा विसरत असल्याची चिंता आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये हिंदू संघटनांच्या विरोधामुळे ख्रिसमस पार्टी रद्द करण्यात आली, तर हिसारमध्ये चर्चसमोर हनुमान चालीसा पठणावरून तणाव निर्माण झाला.
केरळमध्ये कॅरोल गटांमध्ये हिंसक झटापट
केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात ख्रिसमस ईव्हच्या रात्री दोन वेगवेगळ्या कॅरोल सिंगिंग गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले. नूरनाड परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंकडील अनेक जण जखमी झाले.