चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:21 IST2025-11-27T09:18:58+5:302025-11-27T09:21:12+5:30
DK Shivakumar: मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर मला सार्वजनिकपणे भाष्य करायचं नाही. कारण पक्षातील चार-पाच लोकांमध्येच एक सीक्रेट डील झाली होती, असे डीके शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
कर्नाटकात सरकार असलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना पाठिंबा देणारे आमदार थेट दिल्लीत गेले आणि पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. त्यामुळे स्थिर सरकार असूनही कर्नाटकातकाँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. पण, शिवकुमार याबद्दल जाहीरपणे बोलण्यास तयार नाहीत. या सगळ्या घडामोडी सुरू असताना त्यांनी एक विधान केले की, पक्षातील चार-पाच लोकांसोबत एक गोपनीय करार झाला होता आणि मला माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याबद्दल जाहीरपणे काही बोलणार नाही. त्यामुळेच आता काँग्रेस काय करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
जवळपास दहा दिवसांपूर्वी कर्नाटकातील १० आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. त्यांनी थेट शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली. रामनगरचे आमदार इकबाल हुसैन म्हणाले की, पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाचे पालन करू आणि शिवकुमार मुख्यमंत्री बनणार असा विश्वास आहे.
मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून जो गोंधळ सुरू आहे, तो लवकरात लवकर थांबवण्याचे आवाहन आम्ही पक्षाकडे केले. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जावी, अशी मागणीही केल्याचे आमदारांनी सांगितले.
कर्नाटकात अचानक मुख्यमंत्री बदलाची मागणी का होतेय?
मुख्यमंत्री बदलण्यावरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या कर्नाटकातील सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच हा संघर्ष वाढला आहे. सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हाच ते अडीच वर्षे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. आता अशीही चर्चा होत आहे की, २०२३ मध्ये मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि शिवकुमार यांच्यात एक करार झाला होता.
सिद्धारामय्या यांनी काही दिवसांपूर्वीच विधान केले की, ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. तर शिवकुमार म्हणाले की, ते मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर जाहीरपणे बोलू इच्छित नाही. कारण पक्षातील चार-पाच लोकांमध्ये एक गोपनीय करार झाला आणि मला माझ्यावर विश्वास आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला मंजुरी दिली तर सिद्धारामय्याच मुख्यमंत्री राहणार?
एनडीटीव्ही इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सिद्धारामय्या हे मंत्रिमंडळात फेरबदल करण्यावर जोर देत आहेत. तर दुसरीकडे शिवकुमार यांनी अशी भूमिका घेतली आहे की, पक्षाने आधी नेतृत्व बदलण्याचा निर्णय घ्यावा.
अशा संघर्षाच्या काळात काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास होकार दिला, तर त्याचा अर्थ असाही काढला जाईल की, सिद्धारामय्याच पाच वर्षे मुख्यमंत्री असतील आणि शिवकुमार मुख्यमंत्री बनण्याची शक्यता संपून जाईन.
कर्नाटकातील काँग्रेस मंत्री सतीश जारकिहोली यांनी बुधवारी बोलताना सांगितले की, पक्षाने राज्यातील नेतृत्वाचा निर्णय लवकर घ्यावा. यासाठी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. सिद्धारामय्यांनीही हीच भूमिका घेतली आहे. पण, शिवकुमार यांच्या मौनाने पक्षातील संघर्ष वाढला आहे. त्यामुळे काँग्रेस आता काय करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.