डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:35 IST2025-08-21T09:34:35+5:302025-08-21T09:35:49+5:30
India गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सुमारे ५० टक्के एवढं टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे भारताकडून अमेरिकेमध्ये होणााऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र आता भारताला ट्रम्प यांच्या या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सुमारे ५० टक्के एवढं टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे भारताकडून अमेरिकेमध्ये होणााऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र आता भारताला ट्रम्प यांच्या या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला आहे. तसेच भारताचा पूर्वीपासूनचा मित्र रशिया हा भारतासाठी पुन्हा एकदा ढाल बनून समोर आला आहे. भारत आणि रशियाच्या नेतृत्वाखालील युरेशिया ब्लॉकदरम्यान ट्रे़ड डीलबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियनने बुधवारी मॉस्कोमध्ये एका मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू करण्यासंदर्भातील अटीशर्तीवर स्वाक्षऱ्या केल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान हे करारा झाले आहेत.
ईएईयूमध्ये अर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिज प्रजासत्ताक आणि रशियाचा समावेश आहे. भारत सध्या नव्या बाजारपेठेमधील विविधीकरण णि मुख्य व्यापारी भागीदारांसह अनेक व्यापारी करार करत आहे. भारताने हल्लीच इंग्लंडसोबत एफटीएवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच युरोपीयन संघासोबतसुद्धा करारासाठी चर्चा सुरू आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावादरम्यान भारताकडून जागतिक बाजारपेठेमध्ये नव्या संधींचा शोध घेतला जात आहे. तसेच जुना मित्र असलेल्या रशियासोबतही आर्थिक संबंध भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. रशिया हा ईएईयूमधील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तसेच या ब्लॉकसोबत भारताच्या असलेल्या एकूण व्यापारापैकी ९२ टक्के व्यापार हा एकट्या रशियासोबत होतो. या करारासंदर्भातील अटीशर्तींवर भारताकडून वाणिज्य मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अजय भादू आणि युरेशियन इकॉनॉमिक कमिशनच्या व्यापार नीती विभागाचे उपसंचालक मिखाईल चेरेकाएव्ह यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यादरम्यान भादू यांनी ईईसीचे व्यापार प्रभारी मंत्री आंद्रेई स्लेपनेव यांच्याशीही चर्चा केली. दोघांनीही भारत आणी ईएईयू यांच्यातील वाढत्या व्यापार कारभाराबाबत चर्चा केली. तो सुमारे ६९ दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे.