धक्कादायक! तांदूळ चोरीच्या संशयावरून दलित व्यक्तीला झाडाला बांधून बेदम मारहाण; पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:13 IST2024-12-24T13:59:58+5:302024-12-24T14:13:16+5:30
छत्तीसगड येथील एका गावात एका दलित व्यक्तिला तांदूळ चोरीच्या आरोपा प्रकरणी झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक! तांदूळ चोरीच्या संशयावरून दलित व्यक्तीला झाडाला बांधून बेदम मारहाण; पोलिसांनी केली कारवाई
छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. येथे रविवारी सकाळी एका दलित व्यक्तीला तांदूळ चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी एका आदिवासी व्यक्तीसह तिघांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. हे मॉब लिंचिंग असल्याचा काहींनी दावा केला आहे. हे बीएनएस अंतर्गत गुन्ह्याच्या व्याख्येत येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेली माहिती अशी, ही घटना डुमरपल्ली गावात रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र सिदार आहे. काही आवाजामुळे ते जागे झाले व झोपेतून उठल्यावर पंचराम सारथी उर्फ बुटू हा आपल्या घरात घुसून तांदळाची पोती चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे पाहून ते संतापले आणि त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. यानंतर अजय प्रधान आणि अशोक प्रधान आले. त्यानंतर तिघांनी मिळून सारथीला झाडाला बांधले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाने सकाळी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि सकाळी सहा वाजता पोलीस तेथे पोहोचले तेव्हा सारथी बेशुद्ध अवस्थेत एका झाडाला बांधला होता. त्याला बांबूच्या काठीने मारहाण करण्यात आली आणि लाथ आणि ठोसे मारण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.अटक करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध बीएनएस कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
मॉब लिचिंगच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 103 (2) मध्ये मॉब लिंचिंगची व्याख्या अशी केली आहे, 'जेव्हा पाच किंवा अधिक व्यक्तींचा समूह एकत्र येतो. 'जो कोणी खून करेल, अशा गटातील प्रत्येक सदस्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि दंडही होईल.