२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:12 IST2025-12-10T13:10:16+5:302025-12-10T13:12:25+5:30
1.5 Crore Lottery Farm Labour: २०० रुपये रोजाने काम करणाऱ्या एका शेतमजुराला तब्बल दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली. घरात आनंदात वातावरण होतं, ते काही तासांतच भीतीमध्ये बदलले आणि त्याला स्वतःचं घर सोडावं लागलं.

२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
दुसऱ्याच्या शेतात पत्नीसह मजुरी करणाऱ्या एक शेतमजूर लॉटरीमुळे कोट्याधीश बनला. पण, या लॉटरीमुळे त्यांची चिंताच वाढली. लॉटरीचे तिकीट चंदीगढमधील ऑफिसमध्ये जमा करायला गेलेल्या या शेतकऱ्याला अशी माहिती कळली की, क्षणात आनंदाचे भाव जाऊन भीती वाढली. तिथून परत येताच त्याने पत्नी मुलांसह स्वतःचे घरही सोडले. याच कारण होतं गँगस्टर्स! पंजाबमध्ये लॉटरी जिंकणाऱ्या लोकांवर सध्या गँगस्टर्सची नजर असून, ते त्यांच्याकडून धमक्या देऊन वसुली करत आहेत.
पंजाबमध्ये लॉटरी जिंकणाऱ्या लोकांवर गँगस्टर्स नजर ठेवून आहेत. जयपूरमध्ये एका भाजीविक्रेत्याला ११ कोटींची लॉटरी लागली. त्याला धमक्या दिल्या गेल्या. पैसे मागितले गेले. याच भीतीमुळे आता एका शेतमजुराला आपले घर सोडावे लागले.
पंजाबमधील फरिदकोट जिल्ह्यातील सैदके गावात शेतमजूर राम सिंग हे त्यांची पत्नी आणि मुलांसह राहतात. राम सिंग यांना १.५ कोटी रुपयांची लॉटरी लागली. दीड कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्याची माहिती त्यांना एका दिवसानंतर कळाले. कारण लॉटरीचे तिकीट विकणाऱ्याने जेव्हा त्यांना कॉल केला तेव्हा ते राजस्थानमध्ये होते आणि ते कामात असल्यामुळे कॉल घेऊ शकले नाही. विक्रेता घरी गेला तर त्यांच्या घरीही कुणी नव्हते
५० रुपयांचे तिकीट घ्यायचे, पण त्यादिवशी २०० रुपयाचे तिकीट घेतले
राम सिंग नेहमी ५० रुपयांचे तिकीट घेतात. पण, यावेळी त्यांनी २०० रुपयांचे तिकीट घेतले. त्याच तिकिटाने त्याने कोट्यधीश बनवले. त्यांना तीन मुली आहेत. मुलींची लग्न झालेली आहेत, तर मुलगा अविवाहित आहे. दीड कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे कळल्यानंतर त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होतं.
तिकीट घेऊन चंदीगढला गेले...
लॉटरी तिकीट जमा करण्यासाठी ते चंदीगढमधील कार्यालयात गेले. तिथे त्यांना कळले की, हल्ली ज्या लोकांना लॉटरी लागत आहे, त्यांना गँगस्टर्स धमक्या देत आहेत. पैसे वसूल करत आहे. हे ऐकल्यानंतर राम सिंग आणि त्यांची पत्नी घाबरली.
त्यांनी आपले घर सोडले आणि गावातीलच एका जमिनदाराच्या घरी राहायला गेले. आता त्यांचे घर बंद आहे. मोबाइलही बंद आहे. इतकंच काय तर त्यांचे शेजारीही लोक चौकशी करत असल्याने त्रस्त झाले आहे.
पोलिसांनी कुटुंबाला दिला धीर
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राम सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलीस उपअधीक्षक तरलोचन सिंग यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली. नसबी कौर यांनी १.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे आणि त्यांचे कुटुंब सध्या भीतीच्या वातावरणात राहत आहे. कुणी धमक्या देईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. पण, आम्ही त्यांना आश्वस्त केले आहे. घाबरण्याची गरज नाही. जर असा कुणी कॉल केला, तर त्वरित आम्हाला कळवा, असे सांगून त्यांना सुरक्षेची खात्री दिली आहे.