नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:25 IST2025-10-24T08:24:07+5:302025-10-24T08:25:12+5:30
सहा बहिणींच्या कुटुंबामधील एकुलत्या एका भावाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला.

नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे भाऊबीजच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सहा बहिणींच्या कुटुंबामधील एकुलत्या एका भावाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. मृत तरुणाचे नाव सचिन वर्मा असे असून, तो १८ वर्षांचा होता.
ही घटना जिल्ह्यातील हसनपूर पोलीस स्टेशन परिसरातील गंगाचोली गावात घडली. गावातील रहिवासी सचिन वर्मा हा त्याच्या मित्रासोबत भाऊबीज सणासाठी मोटारसायकलवरून हापूर जिल्ह्यातील गारमुक्तेश्वर येथे गेला होता. सचिन घरी परतत असताना, राष्ट्रीय महामार्ग ९ वर मागून एका अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली.
रुग्णालयात तरुणाचा मृत्यू
या भीषण अपघातात सचिन वर्मा आणि त्याचा साथीदार दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सचिन आणि त्याच्या साथीदाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला.
ओळख पटत नव्हती!
सुरुवातीला सचिन याच्याजवळ कोणतीच कागदपत्रे नसल्याने त्याची ओळख पटत नव्हती. अखेर काही तासांच्या तपासानंतर सचिनची ओळख पटली. त्यानंतर गारमुक्तेश्वर कोतवाली पोलिसांनी सचिनच्या कुटुंबाला फोनवरून घटनेची माहिती दिली. सचिनच्या अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ
सचिन हा वर्मा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. सचिनचे वडील सतीशचंद वर्मा यांचे सुमारे १० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सचिन कुटुंबाचा एकमेव कमावता आधार होता. त्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडिलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. सचिन सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या अपघाती निधनाने केवळ एका तरुणाचे आयुष्यच संपवले नाही, तर संपूर्ण कुटुंबाला पोरके झाले.