नातेसंबंध बिघडले म्हणजे बलात्कार झाला असे नाही; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:27 IST2025-11-26T12:27:08+5:302025-11-26T12:27:08+5:30
हॉटेलमध्ये महिलेने लग्नाचा आग्रह धरला असता समाधानने स्पष्ट नकार दिला आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

नातेसंबंध बिघडले म्हणजे बलात्कार झाला असे नाही; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : प्रत्येक बिघडलेल्या नातेसंबंधाला ‘बलात्कार’ ठरविणे गुन्ह्याची तीव्रता कमी करणारे व आरोपीवर अमिट कलंक लावणारे असते म्हणत सुप्रीम कोर्टाने वकिलावरील बलात्कार’ चा गुन्हा रद्द केला.
जानेवारी २०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील वकील समाधान मनमोठे यांची घटस्फोटाच्या प्रक्रियेतील महिलेची ओळख झाली. समाधान यांनी तिच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली; मात्र महिलेने त्यास नकार दिला. मार्च २०२२ मध्ये समाधानने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले व लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
सप्टेंबर २०२२ मध्ये ती गर्भवती असल्याचे समजले. समाधानच्या संमतीने गर्भपात करण्यात आला. त्यानंतर महिला नातेसंबंध तोडू इच्छित होती; मात्र समाधान यांनी लग्नाचे आश्वासन देत संबंध चालूच ठेवले. जुलै २०२३ आणि मे २०२४ मध्ये ती पुन्हा गर्भवती झाली आणि दोन्ही वेळा गर्भपात केला. २० मे २०२४ रोजी त्याच हॉटेलमध्ये महिलेने लग्नाचा आग्रह धरला असता समाधानने स्पष्ट नकार दिला आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
संबंध संमतीने झाले...
कोर्टाने दोघांमधील संबंध संमतीने झाले होते; लग्नाच्या खोट्या आश्वासनाचा कोणताही प्रभाव दिसून येत नाही. नंतर आलेल्या कटुतेमुळे दाखल गुन्ह्याचे हे उदाहरण आहे’, असे म्हटले.
बलात्काराचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, तो केवळ खऱ्या लैंगिक अत्याचार, जबरदस्ती किंवा स्वतंत्र संमती नसल्याच्या प्रसंगीच लागू केला पाहिजे. या तऱ्हेने गुन्हेगारी न्यायव्यवस्थेचा गैरवापर होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.- न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन