धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 15:06 IST2023-01-16T15:05:48+5:302023-01-16T15:06:22+5:30
झारखंडमधील लोहरदगा येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली.

धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन
नवी दिल्ली : झारखंडमधील लोहरदगा येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने विष प्राशन केले तर प्रियकराने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ माजली. हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे काही ग्रामस्थ आणि पंचायत प्रमुखांचे म्हणणे आहे. कारण दोन्हीकडील कुटुंबियांना हे नाते मंजूर नव्हते. त्यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. जंगलाच्या शेजारी वसलेल्या गावातील 15 वर्षीय तरुणीने आपल्या 17 वर्षीय प्रियकरासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला होता. या प्रकारामुळे कुटुंबीय संतापले होते. मृत प्रेमी युगुलाचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे. मुलीच्या नातेवाईकांनी या नात्यावर नाराजी व्यक्त करत मुलाला भेटू देण्यास नकार दिला. मात्र, शनिवारी रात्री घरच्यांनी कडक पवित्रा दाखवल्याने मुलीने घरापासून दूर जाऊन विष पिऊन जीवन संपवले. याबाबतची माहिची प्रियकराला मिळताच त्याच रात्री त्याने घराजवळील झाडावर साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रियकराचे आधीच लग्न ठरले होते पण...
दोघांमध्ये मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मृत मुलगा हा परहिया जमातीचा होता तर मुलगी मुंडा समाजातील होती. लक्षणीय बाब म्हणजे मुलाचे एक वर्षापूर्वी दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले होते, ज्याची पत्रिका देखील छापली होती. मुलाच्या घरच्यांनी काही ठिकाणी पत्रिकांचे वाटप देखील केले होते. असे असतानाही ते दोघे पळून गेले होते. बऱ्याच दिवसांच्या शोधानंतर मे 2022 मध्ये दोघांना पकडून गावात आणण्यात आले. दोघांनाही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करायचे होते. पण दोघांचेही कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"