पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:20 IST2025-12-28T10:19:27+5:302025-12-28T10:20:48+5:30
सततच्या पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका २६ वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क ७ टूथब्रश आणि २ लोखंडी पाने बाहेर काढले आहेत.

पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
वैद्यकीय क्षेत्रातून अनेकदा थक्क करणाऱ्या घटना समोर येत असतात, पण राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक असा प्रकार उघडकीस आला आहे, जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. सततच्या पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका २६ वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क ७ टूथब्रश आणि २ लोखंडी पाने बाहेर काढले आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तरुणाला जीवदान मिळाले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
नेमकं प्रकरण काय?
भीलवाडा येथील राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला गेल्या अनेक दिवसांपासून असह्य पोटदुखीचा त्रास होत होता. घरच्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले, पण काहीच फरक पडत नव्हता. शेवटी त्रास वाढल्याने त्याला जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी जेव्हा त्याची तपासणी आणि सोनोग्राफी केली, तेव्हा जे काही समोर आले ते पाहून स्वतः डॉक्टरांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
२ तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
रुग्णालयातील ज्येष्ठ गॅस्ट्रो सर्जन डॉ. तन्मय पारीक यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. पारीक यांच्या मते, पोटात असलेल्या वस्तूंचा आकार मोठा असल्याने एंडोस्कोपीद्वारे त्या बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे 'ओपन सर्जरी' करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल २ तासांहून अधिक काळ चाललेल्या या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी मोठ्या शिताफीने सातही टूथब्रश आणि दोन्ही लोखंडी पाने बाहेर काढले.
मानसिक स्थितीमुळे घडला प्रकार
तरुणाने या धोकादायक वस्तू पोटात कशा घेतल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण मानसिकदृष्ट्या थोडा कमकुवत आहे. मानसिक संतुलन बिघडलेले असल्यामुळे कोणती गोष्ट खाण्यायोग्य आहे आणि कोणती नाही, याचे भान त्याला राहिले नसावे आणि त्यातूनच त्याने या वस्तू गिळल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डॉक्टरांनी वाचवले प्राण
जर या वस्तू वेळेवर बाहेर काढल्या नसत्या, तर पोटात अंतर्गत जखमा होऊन तरुणाचा जीवही जाऊ शकला असता. या यशस्वी शस्त्रक्रियेत डॉ. तन्मय पारीक यांच्यासोबत भूलतज्ज्ञ डॉ. आलोक वर्मा आणि इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तरुणाच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले असून सध्या तरुण धोक्याबाहेर आहे.