कोटा : आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या या कोचिंग हबमध्ये २०२३च्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत ५० टक्के घट झाल्याचा दावा कोटा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, त्यांनी त्याबाबत कोणतीही आकडेवारी प्रसिद्ध केली नाही.
एका अहवालांनुसार, २०२३ मध्ये कोटामध्ये २६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांची नोंद झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत १७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ‘भविष्यातही हा ट्रेंड कायम राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे,’ असे कोटा जिल्हाधिकारी रवींद्र गोस्वामी यांनी सांगितले.
प्रवेश संख्याही घटली कोटामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी ८५,००० ते १ लाख इतकी झाली आहे. जी त्यापूर्वी दोन ते अडीच लाख इतकी होती. त्यामुळे वार्षिक उत्पन्नात ६,५००-७,००० कोटी रुपयांवरून ३,५०० कोटी रुपयांपर्यंत घट झाली आहे, असे गोस्वामी यांनी सांगितले.