५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 08:31 IST2026-01-09T08:31:09+5:302026-01-09T08:31:43+5:30
इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी एका तीन मुलांच्या मातेने आपल्या सुखी संसाराला तिलांजली दिली आहे.

५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
सोशल मीडियाच्या युगात नात्यांच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत, याचे एक जिवंत आणि तितकेच धक्कादायक उदाहरण बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून समोर आले आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी एका तीन मुलांच्या मातेने आपल्या सुखी संसाराला तिलांजली दिली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा शेवट इतका अकल्पित झाला की, खुद्द पतीनेच पुढाकार घेऊन आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले आणि स्वतः त्या लग्नाचा साक्षीदार बनला.
नेमकं प्रकरण काय?
वैशाली जिल्ह्यातील जंदाहा येथील रहिवासी असलेल्या रानी कुमारी हिचा विवाह २०११ मध्ये कुंदन कुमार यांच्याशी झाला होता. कुंदन हे अहिरपूर येथे ग्राहक सेवा केंद्र चालवतात. लग्नानंतर या जोडप्याला तीन मुले झाली. बाहेरून पाहता हे कुटुंब अगदी सुखी वाटत होते, मात्र या सुखी संसाराला सोशल मीडियाची नजर लागली.
इन्स्टाग्रामवर जुळलं नातं
राणी कुमारी हिचे तिच्याच नात्यातील आतेभावासोबत म्हणजेच गोबिंद कुमारसोबत इंस्टाग्रामवर बोलणे सुरू झाले. हे बोलणे इतके वाढले की, गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गोबिंद आणि राणी यांच्यातील जवळीक वाढल्याने घरात वारंवार वाद होऊ लागले. राणी यापूर्वीही अनेकदा घर सोडून निघून गेली होती, मात्र मुलांच्या भविष्यासाठी कुंदन तिला समजावून परत आणत होते.
पतीने घेतला मोठा निर्णय
पत्नीचे मन आता आपल्यात नसून ती गोबिंदशिवाय जगू शकत नाही, हे जेव्हा कुंदन यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी एक कठोर पण व्यावहारिक निर्णय घेतला. रोजचा मानसिक त्रास आणि कौटुंबिक कलह संपवण्यासाठी कुंदन यांनी राणीला तिच्या प्रियकराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन राणी आणि गोबिंदचे कोर्ट मॅरेज लावून दिले. विशेष म्हणजे, या लग्नात कुंदन स्वतः साक्षीदार म्हणून उभे राहिले आणि हसतमुखाने आपल्या पत्नीला निरोप दिला.
मुलांची जबाबदारी पित्याकडेच
या अजब प्रेमकाहाणीत त्या तीन निष्पाप मुलांचे सर्वात जास्त हाल झाले आहेत . आईने प्रेमासाठी मुलांचा त्याग केला असला तरी, वडील कुंदन यांनी या तिन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे. आता ही मुले त्यांच्या वडिलांकडेच राहणार आहेत. लग्नानंतर राणीने प्रतिक्रिया दिली की, तिला पहिल्या पतीसोबत राहणे असह्य झाले होते आणि तिने हा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतला आहे. तर, दुसरीकडे गोबिंदने आता राणीला आयुष्यभर सांभाळण्याचे वचन दिले आहे.