नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 20:51 IST2026-01-08T20:47:28+5:302026-01-08T20:51:45+5:30
राज्यात भाजपा आमदारांची ही व्यथा असेल तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांची काय परिस्थिती असेल असा प्रश्न पडला आहे.

नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याची तयारी सुरू असताना भाजपाच्या ५ आमदारांनी लेटर बॉम्ब फोडला आहे. वडोदराच्या ग्रामीण भागातील ५ भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना सामूहिक पत्र लिहित अधिकाऱ्यांवर आगपाखड केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था ढासळली आहे. लोकांची कामे या अधिकाऱ्यांकडे पोहचत नाहीत. एका सामान्य माणसाला त्याचं सरकारी काम करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे येरझारा माराव्या लागतात. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांपासून छोट्या कर्मचाऱ्यांपर्यंत मनमानी कारभार सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.
भाजपा आमदारांकडून प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे राज्यातील भाजपा सरकारवरच टीका होऊ लागली आहे. गांधीनगरच्या सावली येथील आमदार केतन इनामदार म्हणाले की, ही वेळ अधिकाऱ्यांमुळेच आमच्यावर आली. सतत मागणी आणि बैठका घेऊनही अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीत बदल झाला नाही असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना ज्या भाजपा आमदारांनी पत्र लिहिले त्यात आमदार शैलेष मेहता, केतन इमानदार, धर्मेंद सिंह वाघेला, अक्षय पटेल आणि चैतन्य सिंह यांचा समावेश आहे. या सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी, जिल्हा बांधकाम अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त यांच्यावर आरोप केले आहेत.
अधिकाऱ्यांच्या या टोळीने सरकारी सेक्रेटरीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जमिनीवरील परिस्थिती, लोकांची समस्या, भौगोलिक स्थिती याची कुठेही माहिती न घेता चांगले चित्र समोर उभे करत आहेत आणि प्रत्यक्षात सरकारला खऱ्या समस्यांपासून दूर ठेवले जात आहे. हे अधिकारीच स्वत:ला सरकार समजत आहेत. आंधळा कारभार सुरू ठेवला आहे त्यातून सरकारची प्रतिमा जनतेत खराब होत आहे. वडोदरा ग्रामीण येथील कोटंबी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार होता. वडोदरात १६ वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाणार आहे त्याच वेळी हा वाद समोर आला आहे.
राज्यात सत्ताधारी भाजपा आमदारांनी अधिकाऱ्यांना सांगितलेले कामे होत नाहीत, त्यात अधिकारी लोकांना तुम्ही आमदारांची मदत का घेतोय असा प्रश्न विचारत आहेत. या खराब मानसिकतेत प्रशासन चालवणे ठीक नाही. या सर्वांविषयी मौखिक तक्रारही दिली आहे. लोकप्रतिनिधींच्या कामांना प्राधान्य दिले जात नाही. लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या ५ आमदारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी हे वडोदरा येथील प्रभारी मंत्री आहेत. सरकारने अलीकडेच नव्या अधिकाऱ्यांची बदली केली. जर राज्यात भाजपा आमदारांची ही व्यथा असेल तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांची काय परिस्थिती असेल असा प्रश्न पडला आहे.