बेळगावात पाचशे रुपयांच्या ४९५ बनावट नोटा जप्त, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:39 IST2026-03-18T13:38:42+5:302026-03-18T13:39:26+5:30
दुकानदाराला संशय आल्याने उलगडले प्रकरण

बेळगावात पाचशे रुपयांच्या ४९५ बनावट नोटा जप्त, चौघांना अटक
बेळगाव: बेळगाव शहरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन आणि वाहनासह ५०० रुपयांच्या एकूण ४९५ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
मोहम्मद अरबाज (वय २१, रा. दक्षिण गोवा), रुपेश हनुमंत वाकोडे (२६, रा. गोवा), मोहम्मद हुसेन बक्की (२३, रा. मडगाव, दक्षिण गोवा) आणि श्रवणकुमार तुंतुमल्ली (२५, रा. बेगुसराय, बिहार) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२६ रोजी आरोपींनी खडे बाजार रोडवरील एका दुकानातून वस्तू खरेदी केल्या आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा वापरून पैसे दिले. दुकानदाराला नोटा बनावट असल्याचा संशय येताच त्याने मार्केट पोलिस ठाण्याला याची माहिती दिली.
तत्काळ कारवाई करत पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संशयितांना पकडून ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान चौघांनीही परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी पुढील कारवाई करत आरोपींकडून ५०० रुपयांच्या एकूण ४९५ बनावट नोटा, अंदाजे ४०,००० रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, एक कार असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.