43 killed, 14 injured in fierce fire in Delhi | दिल्लीमधील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, १४ जखमी
दिल्लीमधील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

- टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : दिल्लीतील झंडेवालान भागातील अनाज मंडीतील चार मजली इमारतीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांना प्राण गमवावे लागले तर १४ जण जखमी झाले. या इमारतीचा मालक रेहानला पोलिसांना सायंकाळी अटक केली. घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी धावले. ६० बंबांनी चहुबाजुंनी हा परिसर घेरला होता, मात्र अरूंग गल्लीमुळे मदतकार्यात खूप अडथळे आले. सलग चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. एका मजल्यावरील कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इमारतीत ६० पेक्षा अधिक लोक होते. त्यापैकी ४३ जण मरण पावल्याचे पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे लोळ चहुबाजूने येत असल्याने कामगारांना इमारतीतून बाहेर पडणे मुश्किल झाले. या आगीच्या धुराने अनेक जण बेशुद्ध झाले.

या इमारतीत प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना होता. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला कारखाना चौथ्या मजल्यावर होता. कारखान्यातील कामगार काम केल्यानंतर तेथेच झोपत असत. गाढ झोपलेल्या या कामगारांना रविवारचा सूर्य पाहता येणार नाही, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

आगीत जखमी झालेल्यांना राममनोहर लोहिया व लोकनायक जयप्रकाश रुग्णालय व हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांना या तिन्ही रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागल्याने चांगलाच मनस्ताप झाला. ३४ जणांना ३४ मृृतावस्थेत रुग्णालयात आणले होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Web Title: 43 killed, 14 injured in fierce fire in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.