उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे लागेबांधे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 09:41 IST2025-11-24T09:40:17+5:302025-11-24T09:41:55+5:30
सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांसह एनआयए अधिकारी राज्यातील चार शहरांत, काश्मीरमध्ये अटक केलेल्या डॉक्टरांशी संबंधित संशयितांचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे लागेबांधे
राजेंद्र कुमार
लखनौ : दिल्ली बॉम्बस्फोटांमागील व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलमधील अटक केलेल्या काश्मिरी डॉक्टरांचा उत्तर प्रदेशशी संबंध असल्याचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उत्तर प्रदेशात तपासाला वेग दिला आहे. एनआयएने काश्मीरमधील रहिवासी डॉ. आदिल अहमद, त्याचा साथीदार डॉ. मुझम्मिल, डॉ. शाहीन आणि डॉ. परवेझच्या मोबाईल कॉल डिटेल्सद्वारे पुढे आलेल्या सुमारे ४०० संशयितांच्या भूमिकेचीदेखील चौकशी सुरू केली आहे.
सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांसह एनआयए अधिकारी राज्यातील चार शहरांत, काश्मीरमध्ये अटक केलेल्या डॉक्टरांशी संबंधित संशयितांचा शोध घेत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहेत का, हे तपासले जात आहे. याव्यतिरिक्त, एटीएस व एनआयए सहारनपूरमधून काश्मिरींना विकल्या गेलेल्या ३२ वाहनांची चौकशी करत आहे.
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर डॉ. शाहीन, डॉ. आदिल, डॉ. मुझम्मिल आणि मुफ्ती इरफान अहमदला ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेले लॅपटॉप आणि मोबाईल फोन तपासून, त्यांच्या संपर्कांची माहिती गोळा करून त्यांची भूमिका निश्चित केली जात आहे. या संदर्भात, डॉ. शाहीनचा धाकटा भाऊ, लखनौ येथील रहिवासी डॉ. परवेझच्या संपर्कात असलेल्या तरुणांचीही चौकशी सुरू आहे. ४०० संशयितांच्या भूमिकेचा तपास तीव्र करण्यात आला आहे.
सहारनपूरवर लक्ष केंद्रित
एनआयए अधिकारी सहारनपूरमधील डॉक्टरांच्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे वृत्त आहे. मसूद अझहर एकेकाळी या शहरातील एका प्रार्थनास्थळात राहत होता. शिवाय, दिल्ली कार बॉम्बस्फोटप्रकरणी डॉ. आदिल अहमदलाही याच शहरात अटक झाली. सहारनपूरमध्ये अनेक कार काश्मिरींनी खरेदी केल्याचेही एनआयएला कळले आहे.
आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता
लखनौ, कानपूर आणि सहारनपूर तसेच प्रयागराज, वाराणसी, संभल आणि पिलीभीतसह इतर शहरांमध्ये व्हाइट कॉलर दहशतवादी डॉक्टरांचे नेटवर्क असल्याचे पुरावे समोर येत आहेत. या प्रकरणाची चौकशीदेखील सुरू झाली आहे. एनआयए अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दहशतवादी डॉक्टरांच्या लपण्याच्या ठिकाणांचा शोध सुरू आहे आणि लवकरच उत्तर प्रदेशात आणखी काही व्यक्तींना अटक होऊ शकते. जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी आणि उत्तर प्रदेशात एमबीबीएस करीत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली जात आहे. अटक केलेल्या डॉक्टरांचा या व्यक्तींशी काही संबंध आहे का, हे शोधण्याचा तपास यंत्रणा प्रयत्न आहे.