4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:28 IST2025-11-20T11:26:20+5:302025-11-20T11:28:02+5:30
पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे कारम समोर येईल.

4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
झांसी : मुंबईहूनउत्तर प्रदेशला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंईतील एका कंपनीत लेबर इंचार्ज म्हणून कार्यरत असलेले फूलचंद्र निषाद कुशीनगर एक्सप्रेसने आपल्या मूळ गावी (बस्ती, उत्तर प्रदेश) जात होते. मात्र, वाटेतच त्यांना अचानक आलेल्या 4-5 उचक्या आल्या अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झांसीपासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर घडली. त्यांचे सहकारी बलराम आणि तिलकराम यांनी सांगितले की, “अतिशय आनंदी स्वभावाचे असलेले फूलचंद्र मुंबईत स्मार्ट सिटी कंपनीत काम करत होते. शेतीचा हंगाम असल्याने आम्ही तिघे गावी निघालो होतो. मात्र, अचानक त्यांना उचक्या आल्या आणि त्यांची प्रकृती बिघडली. आम्ही त्यांना तात्काळ सीटवर झोपवले आणि झांसी रेल्वे स्थानकावरील जीआरपीला माहिती दिली.
सूचना मिळताच जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे डॉक्टर त्वरित प्लॅटफॉर्मवर पोहोचले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करुन फूलचंद्र यांना मृत घोषित केले. जीआरपी प्रमुख रवींद्र मिश्रा यांनी सांगितले की, “संबंधित प्रवाशाचा मृतदेह कोचमधून उतरवला आणि पंचनामा करुन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.” दरम्यान, फुलचंद यांच्या अचानक जाण्याने सहकार आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.