387 agents arrested in case black ticket business of railway in the country | देशभरात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, ३८७ एजंट अटकेत
देशभरात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, ३८७ एजंट अटकेत

ठळक मुद्देमध्य रेल्वेकडून ३५ जणांवर कारवाई ६८ लाख २५ हजार ४९९ रुपये किंमतीची ३ हजार ५१५ तिकीटे जप्त ३८७ जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल

पुणे : रेल्वे सुरक्षा दल व इतर विभागांनी देशभरात ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत एकाच दिवशी केलेल्या कारवाईत रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे जाळे उध्वस्त केले. देशभरातून तब्बल ३८७ तिकीट एजंटांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ३३ लाख रुपयांची तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी यापुर्वी ३ कोटी २५ लाख रुपये किंमतीची तिकीटे बेकायदेशीरपणे विकल्याचेही समोर आले आहे.
मागील दोन महिने शाळा-महाविद्यालयांची उन्हाळी सुट्टी, लग्नाचे मुहूर्त यांमुळे सर्वच रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. लांबपल्ल्याच्या बहुतेक गाड्या प्रवाशांनी भरून धावत होत्या. या काळात काही जणांकडून तिकीटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. काही तिकीट एजंट तिकीट खिडकीसह ई-तिकीटींग सुविधेचा दुरूपयोग करून तिकीट खरेदी करून प्रवाशांना जादा दराने विकत होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या. यापार्श्वभुमीवर रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरूण कुमार यांनी रेल्वेच्या तांत्रिक व आयटी कक्षाच्या मदतीने संबंधित तिकीट एजंटांची माहिती जमा केली. त्यानंतर त्यांनी देशभरात एकाच दिवशी त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईला ‘ऑपरेशन थंडर’ असे नाव देण्यात आले. त्यानुसार दि. १३ जून रोजी एकाच दिवशी १४१ शहरांमधील २७६ ठिकाणी छापा टाकण्यात आला. 
विविध ठिकाणी ३८७ जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३२ लाख ९९ हजार ९३ रुपयांची २२ हजार २५३ तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. या एजंटांनी यापुर्वीही तब्बल ३ कोटी २४ लाख १२ हजार ७०६ रुपये किंमतीची तिकीटांचा काळाबाजार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईअंतर्गत ३७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संशयित युझर आयडी आणि जप्त तिकीटे निष्क्रीय करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोटा (राजस्थान) येथून ‘एएनएमएस’ आणि रेड मिर्ची ही संगणक प्रणाली जप्त करण्यात आली आहे. भविष्यातही अशी कारवाई करण्याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सुचना दिल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.  
-----------

मध्य रेल्वेकडून ३५ जणांवर कारवाई

‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मध्य रेल्वेकडून करण्यात आलेल्या कारवाईत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६८ लाख २५ हजार ४९९ रुपये किंमतीची ३ हजार ५१५ तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये यापुर्वीच्या प्रवासाची ६२ लाख ८० हजार ८९१ रुपये किंमतीची तिकीटे आहेत. तर उर्वरीत ५ लाख ४४ हजार ६०८ रुपये किंमतीची तिकीटे यापुढील प्रवासाची आहेत. ही कारवाई पुण्यासह चिंचवड, पिंपरी, घाटकोपर, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, नागपुर, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, शिर्डी, सोलापुर आणि सांगली या ठिकाणच्या २१ खासगी ट्रॅव्हल एजन्सी आणि १२ आरक्षण केंद्रांमध्ये करण्यात आली.


Web Title: 387 agents arrested in case black ticket business of railway in the country
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.