८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 06:58 IST2025-08-09T06:57:06+5:302025-08-09T06:58:57+5:30
धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री मार्गावरील प्रमुख शिबिर असलेल्या धरालीत मंगळवारी झालेल्या जलप्रलयानंतर अजूनही स्थिती अत्यंत बिकट आहे. भौगोलिक अडचणींमुळे या भागातील माती-दगडांचा गाळ काढून बेपत्ता लोकांचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले आहे. धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सेन्सिंग उपकरणही अडकले
गाळात अडकून पडलेला कुणी जिवंत आहे का हे सांगणारे हायटेक थर्मल सेन्सिंग उपकरण तसेच मोठ्या मशीन अजूनही धरालीपासून ६० किमी अंतरावर भटवाडी भागात दोन दिवसांपासून अडकून पडल्या आहेत. या मशीन आणण्यासाठी असलेल्या रस्ते मार्गावर भूस्खलन झाल्याने ते बंद झाले आहेत.
ते ३४ सेकंद ...
मंगळवारी अवघ्या ३४ सेकंदात खीरगंगेतून प्रचंड वेगाने पाणी व गाळ वाहून आला आणि धराली गाव या गाळाने गिळंकृत केले. आतापर्यंत अधिकृतरीत्या ५ मृत्यूंना पुष्टी मिळाली असली तरी गाळात नेमके किती लोक दबले गेले आहेत, याची आकडेवारी सांगणे कुणालाच सध्या तरी शक्य नाही.
नदी गाळाने तुंबली
उत्तरकाशीत ढगफुटीनंतर भागीरथी नदीला मिळणाऱ्या खीरगंगा नदीतून वेगवान प्रवाहाने वाहून आलेली माती व दगडांनी धराली गाव उद्ध्वस्त केलेच, शिवाय भागीरथीचे विस्तीर्ण पात्रही निम्म्याहून अधिक बुजवले. ‘इस्रो’ने प्रलयानंतर हे वास्तव सॅटेलाईटच्या माध्यमातून टिपले आहे.
खीरगंगेने मूळ रूप घेतले
उपग्रहामार्फत टिपलेल्या या छायाचित्राचे निरीक्षण केले तर लक्षात येते की, धरालीच्या वस्तीमुळे ज्या खीरगंगा नदीचे पात्र अरुंद झाले होते त्या नदीने आता आपले क्षेत्र पुन्हा मिळवत मूळ रूप घेतले आहे.