‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 05:42 IST2025-10-19T05:35:19+5:302025-10-19T05:42:21+5:30
कमी कॅरेटच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल, ग्राहकांची दिवसभर रेकॉर्डब्रेक गर्दी, दरवाढीनंतरही ग्राहकांचा ओघ वाढलाच, एक लाख कोटींची खरेदी

‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/जळगाव : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शनिवारी सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सोने ३ हजारांनी घसरून १ लाख २८ हजार ५०० रु.वर, तर चांदीत ७ हजारांची घसरण होऊन ती १ लाख ७१ हजार रु.वर आली. या घसरणीने खरेदीसाठी सुवर्णपेढ्यांमध्ये मोठी गर्दी होऊन करोडो रुपयांची उलाढाल झाली.
नेहमीच्या तुलनेत धनत्रयोदशीला दीडपट उलाढाल आहे. सोने खरेदीचा ग्राहक कमी दिसत असून त्याचा कल ९ ते १८ कॅरेटच्या हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या खरेदीकडे दिसून आला. तसेच डिजिटल गोल्ड, नाणी आणि ईटीएफसारख्या गुंतवणुकीचाही मार्ग ग्राहकांनी स्वीकारला आहे.
एक लाख कोटींची खरेदी
दिवाळीच्या निमित्ताने सोन्या, चांदीची देशभरात प्रचंड खरेदी झाली असून ती सुमारे १ लाख कोटी रु.ची असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेने शनिवारी दिली. या संघटनेनुसार फक्त सोने आणि चांदीची विक्रीच ६० हजार कोटींपर्यंत पोहचली असून ही मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्याने जास्त आहे.
वर्षात ४९ हजारांनी वधारले
गेल्या ५० वर्षांत सोन्याच्या भावाने २४ हजार टक्क्याने उसळी घेतली आहे. १९७५ मध्ये ५४० रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याचे भाव आता १ लाख २८,५०० रु.वर पोहचले आहेत.
सुवर्णसाठ्याचे मूल्य १०० अब्ज डॉलरच्या पुढे
आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील सोन्याच्या साठ्याने प्रथमच १०२.३६५ अब्ज डॉलर इतके विक्रमी मूल्य गाठले आहे. चालू वर्षांत आरबीआयने सोने खरेदी मंद गतीने केली होती. हे मूल्य वाढण्याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ हे आहे.
सराफ पेढ्या गजबजल्या
धनत्रयोदशीला सोने खरेदीला महत्त्व असल्याने मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत सराफपेढींमध्ये गर्दी दिसत होती. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत दीडपट सोन्याची विक्री होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.