अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:21 IST2025-06-17T11:15:51+5:302025-06-17T11:21:14+5:30
Cricketer Dirgh Patel Died: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एका २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद झालेल्या भीषण विमान अपघाताच्या दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. या विमान अपघातात २७० हून अधिक जणांना आपला जीव गमावला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते कोसळलं आणि त्याने पेट घेतला. त्यामुळे विमानासह आजूबाजूचा परिसर भस्मसात झाला. या विमानात एका प्रवाशाला सोडून सर्वांचा जीव गेला. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. आता या विमान अपघातात एका २३ वर्षीय क्रिकेटपटूचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबादमध्येएअर इंडियाचे विमान एआय-१७१ कोसळल्यानंतर शेकडो कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एअर इंडियाचे विमान दुपारी १.३८ वाजता लंडनला निघाले. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले आणि विमानातील प्रवाशांसह २७० हून अधिकजण मृत्यूमूखी पडले. यामध्ये एका तरुण क्रिकेटपटूचाही समावेश असल्याचे समोर आलं आहे. मृत्युमुखी पडलेल्या २७० जणांमध्ये २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेल याचाही समावेश होता. दीर्घ पटेलने हडर्सफील्ड विद्यापीठातही शिक्षण घेतले होते. त्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये एमएससी पूर्ण केले होते.
बीबीसी आणि एअरडेल अँड व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगनुसार, दीर्घ पटेल अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २४१ प्रवाशांपैकी एक होता. २०२४ मध्ये दीर्घ हा लीड्स मॉडर्नियन्स सीसीचा खेळाडू होता. त्याने २० सामन्यांमध्ये ३१२ धावा केल्या आणि २९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच वर्षी त्याने पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्याच्या निधनाची बातमी ऐकून क्लबलाही खूप दुःख झाले आहे. मूळचा गुजरातचा रहिवासी असलेला दीर्घ पटेलचा नवीन नोकरीत स्थिरावल्यानंतरही खेळण्याचा मानस होता, असं एअरडेल अँड व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
हडर्सफील्ड विद्यापीठातील एका प्राध्यापकाने सांगितले की, "दिर्घ पटेल हा एक मुलगा होता जो त्याच्या शैक्षणिक क्षमतेसाठी, प्रेमळपणासाठी आणि आवडीसाठी ओळखला जात होता. त्याला नेहमीच अभ्यासाबद्दल उत्सुकता असायची. तो वर्गात येऊन मला प्रश्न विचारत होता ज्यावरून त्याची आवड दिसून येत होती."