सीमेवर मिनिटाला ७०० गोळ्यांचा वर्षाव होणार...! पहिल्या २००० 'प्रहार' मशीन गन सैन्याला मिळाल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:19 IST2026-03-31T12:17:54+5:302026-03-31T12:19:16+5:30
2000 Prahaar LMG for Indian Army: अडाणी डिफेन्सने मिनिटाला ७०० गोळ्या झाडणाऱ्या २००० 'प्रहार' लाइट मशीन गनची पहिली खेप लष्कराला दिली आहे. LAC आणि LOC वरील सुरक्षेसाठी याचा मोठा उपयोग होईल.

सीमेवर मिनिटाला ७०० गोळ्यांचा वर्षाव होणार...! पहिल्या २००० 'प्रहार' मशीन गन सैन्याला मिळाल्या
भारतीय लष्कराची सीमेवरील मारक क्षमता वाढवण्यासाठी अडाणी डिफेन्स अँड एयरोस्पेसने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २८ मार्च रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, भारतीय सैन्याला २,००० 'प्रहार' लाइट मशीन गन ची पहिली खेप अधिकृतपणे सोपवण्यात आली.
काय आहे 'प्रहार' मशीन गनची ताकद?
ग्वाल्हेरच्या 'स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्स'मध्ये तयार करण्यात आलेल्या या ७.६२ मिमी कॅलिबरच्या शस्त्रांची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. ही मशीन गन एका मिनिटाला ७०० गोळ्यांचा वर्षाव करू शकते. मारक क्षमता ही १,००० मीटर (१ किमी) अंतरापर्यंत अचूक निशाणा साधण्याची आहे. केवळ ८ किलो वजनाच्या या मशीन गनची लांबी ११०० मिमी आहे, ज्यामुळे ती वाहून नेण्यास अत्यंत सोपी आहे.
LAC आणि LOC वर होणार तैनात
या आधुनिक शस्त्रांचा वापर प्रामुख्याने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमांवर केला जाणार आहे. दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये गस्त घालणाऱ्या जवानांसाठी ही मशीन गन अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
लष्करी क्षेत्रातील आत्मनिर्भरता
या कार्यक्रमाला संरक्षण मंत्रालयाचे डीजी ए. अंबरासु आणि अडाणी डिफेन्स अँड एयरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी उपस्थित होते. भारताने संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भर' होण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. खासगी क्षेत्रातील सहभागामुळे भारतीय सैन्याला जागतिक दर्जाची शस्त्रे आता देशातच उपलब्ध होत आहेत.