उत्तर प्रदेशात मतदारयाद्यांतून वगळली २.८९ कोटी नावे; SIR चा जबर दणका; प्रत्येक पाचवा मतदार यादीतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:59 IST2026-01-07T09:59:09+5:302026-01-07T09:59:09+5:30
आता ६ फेब्रुवारीपर्यंत याबाबतचे दावे-आक्षेप नोंदवून घेतले जातील आणि ६ मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाईल.

उत्तर प्रदेशात मतदारयाद्यांतून वगळली २.८९ कोटी नावे; SIR चा जबर दणका; प्रत्येक पाचवा मतदार यादीतून बाहेर
राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : उत्तर प्रदेशातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात (एसआयआर) निवडणूक आयोगाने सुमारे २.८९ कोटी नावे मतदारयाद्यांतून वगळली आहेत. मंगळवारी मसुदा याद्या जाहीर झाल्यानंतर वगळलेली नावे स्पष्ट झाली. आता ६ फेब्रुवारीपर्यंत याबाबतचे दावे-आक्षेप नोंदवून घेतले जातील आणि ६ मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाईल.
राज्यात पुनरिक्षणापूर्वीच्या याद्यांत मतदारांची संख्या १५.४४ कोटी होती. ही संख्या एकदम १२.५५ कोटींवर आली आहे. या मूळ याद्यांतून २,८८,७४,१०८ नावे वगळण्यात आली आहेत. कुणाचे नाव मसुदा यादीतून नजरचुकीने वगळले गेले असेल तर दावे-आक्षेप नोंदवून दुरुस्ती करता येऊ शकेल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी म्हटले आहे.
फटका कोणत्या पक्षाला
राज्यात दीर्घकाळ सुरू राहिलेल्या मतदारयाद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रियेचा हा फटका नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाला बसेल याची चर्चा सुरू झाली असून या प्रक्रियेमुळे आगामी काळातील निवडणुकांची दिशा निश्चित होणार आहे. याचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
भाजपला फटका बसण्याची कारणे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वगळलेल्या नावांपैकी बहुतांश भाजप समर्थक असल्याचे म्हटले होते. यावर पक्षात आता विचारमंथन सुरू झाले आहे. कारण, दीर्घकाळ सुरू राहिलेल्या या प्रक्रियेत भाजपचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते आपल्या समर्थकांचे अर्ज भरू शकले नाहीत. विशेष म्हणजे आयोगाने दोन वेळा यासाठी मुदत वाढवली होती.
ममतांचा गंभीर आरोप
पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत निवडणूक आयोग भाजपच्या आयटी विभागाने तयार केलेल्या मोबाईल ॲपचा अनधिकृत वापर करीत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोग एसआयआर प्रक्रियेदरम्यान "सर्व प्रकारचे चुकीचे मार्ग" अवलंबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
क्रिकेटपटू मोहम्मद शमी याला एसआयआर पडताळणी सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु तो विजय हजारे ट्रॉफीत व्यग्र असल्याने उपस्थित राहू शकला नाही.
खा. ओब्रायन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
एसआयआरच्या प्रक्रियेतील अनियमिततेविरुद्ध तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ते म्हणाले "निवडणूक आयोग मनमानीपणे किंवा कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन काम करू शकत नाही."
काँग्रेस नेते गुरदीपसिंग सप्पल यांनी उत्तर प्रदेशातील मतदारयादीतून आपल्या सर्वच कुटुंबीयांची नावे गायब झाल्याचा दावा केला.
आसाममधील मसुदा मतदारयादीत गंभीर अनियिमतता असल्याचा दावा काँग्रेस नेते व राज्यातील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी केला.
प. बंगालमध्ये एसआयआरबाबत सर्वाधिक ६१ हजार दावे भाजपने दाखल केले आहेत.