झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टरमाइंड ‘तुफान’सह १६ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:20 IST2026-01-23T09:20:06+5:302026-01-23T09:20:43+5:30
अनल ऊर्फ ‘तुफान’वर होते २.३५ कोटी रुपयांचे इनाम!

झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टरमाइंड ‘तुफान’सह १६ जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली: झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टरमाइंड व केंद्रीय समिती सदस्य अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतिराम मांझी याच्यासह १६ माओवाद्यांना ठार करण्यात गुरुवारी सुरक्षा दलाला यश आले. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे. १५ मृतदेहांपैकी ११ जणांची ओळख पटली असून उर्वरित चार जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर तब्बल २.३५ कोटीचे इनाम होते. कोब्रा कमांडोंनी सारंडाच्या घनदाट जंगलात त्याला अचूकपणे टिपले, त्यामुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.
अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतीराम मांझी हा झारखंडच्या झरहाबाले (जि. गिरीडीह) येथील रहिवासी होता. तो साथीदारांसह सारंडाच्या जंगलात मोठी बैठक घेणार असल्याची ‘टीप’ सुरक्षा दलांना मिळाली होती. आयजी साकेत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा २०३, २०५ आणि २०९च्या जवानांनी जंगलात सापळा रचला, यावेळी माओवाद्यांना पळायलाही जागा उरली नाही. घनदाट जंगलात झालेल्या या चकमकीत कोब्रा जवानांनी आपल्या अचूक निशाण्याने नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले. १२ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले.
दहशत संपली
जवानांवर हल्ले, खून, स्फाेट, शस्त्रे लुटणे अशा स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांत ‘तुफान’चा सहभाग होता. तो केवळ हिंसक कारवायांत सहभागी नव्हता, तर तो पोलिसांना चकमा देण्यातही माहीर होता.
हत्या, स्फोट आणि शस्त्रे लुटण्यासारख्या शेकडो गुन्ह्यांत तो वॉन्टेड होता. सारंडा आणि गिरिडीहच्या जंगलात त्याचे एकतर्फी साम्राज्य होते. मात्र, जवानांच्या शौर्यापुढे त्याच्या दहशतीचा अंत झाला आहे.
१५०० जवान सहभागी
किरिबुरू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारंडा जंगलातील कुमडी भागात झालेल्या कारवाईत सीआरपीएफचे १,५०० जवान सहभागी झाले. कोल्हान-सारंडा या भागात अजूनही नक्षली कारवाया सुरू आहेत.