वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रेन वॉश अन् १५ वर्षीय मुलगा बनला गुप्तहेर; लष्करी तळांचे व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:58 IST2026-01-06T10:52:04+5:302026-01-06T10:58:22+5:30
पठाणकोटमध्ये १५ वर्षीय मुलाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रेन वॉश अन् १५ वर्षीय मुलगा बनला गुप्तहेर; लष्करी तळांचे व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले
Punjab High Alert: भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी पाकिस्तानच्याआयएसआय या गुप्तचर संघटनेने आता एक नवा आणि अतिशय भयानक मार्ग निवडल्याचे समोर आले आहे. पंजाब पोलिसांनी एका १५ वर्षीय मुलाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली असून, या घटनेने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, केवळ हा एकच मुलगा नव्हे, तर पंजाबमधील अनेक अल्पवयीन मुले आयएसआयच्या जाळ्यात अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पठाणकोट पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि पाळत ठेवल्यानंतर जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील एका १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. हा मुलगा गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानातील आयएसआय हँडलर्सच्या सतत संपर्कात होता. तपासादरम्यान असं समोर आले की, या मुलाने आपल्या मोबाईल फोनद्वारे भारताच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती सीमेपार पाठवली होती.
पठाणकोटच्या माधोपूर परिसरातून पोलिसांनी एका १५ वर्षीय मुलाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा मुलगा थेट पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आणि दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासातून या मुलाच्या गुन्हेगारी प्रवासाची अत्यंत विचित्र माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्याचा रहिवासी असलेला हा मुलगा अवघा आठवी पास आहे. दीड वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचा परदेशात मृत्यू झाला होता. मात्र, हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या आहे, असे समजून तो नैराश्यात गेला. याच रागातून त्याने सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. त्याच्या याच हालचालींवर लक्ष ठेवून आयएसआय ने त्याला आपल्या जाळ्यात ओढले आणि देशाविरुद्ध वापरण्यास सुरुवात केली.
एअरबेस आणि लष्करी तळांची केली रेकी
हा अल्पवयीन मुलगा अनेकवेळा पठाणकोटमध्ये येत असे. त्याने येथील अत्यंत संवेदनशील लष्करी ठिकाणे, फोटो आणि व्हिडिओ काढून थेट पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांना पाठवले आहेत. पठाणकोट हे चहुबाजूंनी लष्करी तळांनी वेढलेले असून जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या सीमा जवळ आहेत. त्यामुळे या मुलाने पुरवलेली माहिती एखाद्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची पूर्वतयारी तर नव्हती ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या मुलाचे सोशल मीडिया अकाऊंट पाकिस्तानी दहशतवाद्यांनी तयार केले होते. त्याचे एक्सेस पाकिस्तानात होते आणि त्याच नंबरवरून दोन्ही देशांतून संवाद सुरू होता. धक्कादायक म्हणजे, या मुलाच्या माध्यमातून पंजाब आणि इतर राज्यांतील अनेक तरुण देशविरोधी कारवायांसाठी जोडले जात होते. मुलाच्या मोबाईलमध्ये भारतीय लष्कराशी संबंधित अत्यंत गोपनीय दस्तऐवज आणि व्हिडिओ सापडले आहेत.
अटकेत असलेल्या मुलाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा मुलगा एकटाच हे काम करत नव्हता. पंजाबच्या विविध जिल्ह्यांतील इतर अनेक अल्पवयीन मुले देखील पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून या मुलांना जाळ्यात ओढले जात असल्याचे समजते.
पठाणकोटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दलजिंदर सिंह धिल्लण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, "आम्ही ज्या मुलाला ताब्यात घेतले आहे, तो केवळ १५ वर्षांचा आहे. तपासादरम्यान त्याने पाकिस्तानात कशा प्रकारे डेटा पाठवला, याची महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पंजाबमधील इतरही मुले यात गुंतलेली असावीत, असे इनपुट्स आमच्याकडे आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना यासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
पंजाबमध्ये हाय अलर्ट; पालकांसाठी धोक्याची घंटा
या प्रकारानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सीमावर्ती भागातील मुलांच्या ऑनलाईन हालचालींवर पोलीस आता बारीक लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुलांना टार्गेट करून त्यांना देशाच्या विरोधात कशा वापरत आहेत, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.