१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:21 IST2025-08-11T12:21:05+5:302025-08-11T12:21:33+5:30
Daycare Center News: नोएडामधील एका डे केअर सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या डे केअर सेंटरमध्ये एका चिमुकल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
हल्ली छोट्या कुटुंबांमुळे लहान मुलांना सांभाळण्यासाठी घरी कुणी नसल्यास नोकरदार महिलांकडून मुलांना डे केअर सेंटरमध्ये ठेवलं जातं. मात्र बऱ्याचदा अशा ठिकाणी मुलांचा योग्य प्रकारे सांभाळ होत नसल्याचे दिसून येते. दरम्यान, नोएडामधील एका डे केअर सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या डे केअर सेंटरमध्ये एका चिमुकल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. तसेच ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाली असून, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
या डे केअर सेंटरमधील सीसीटीव्हीमध्ये डे केअर वर्क मुलाला घेऊन फिरताना दिसत आहे. मात्र काही वेळातच ती मुलाला वारंवार जमिनीवर आपटताना दिसत आहे. एवढंच नाही तर ती मुलाला मारताना आणि त्याचा चावा घेतानाचं कृत्यही कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहे. आता मुलाच्या शरीरावर चावा घेतल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत.
या घटनेमुळे डे केअर सेंटरमधील संस्थांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाली आहे. मुलांना अशा ठिकाणी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण मिळण्याची आवश्यकता असते. मात्र त्यांना शारीरिक हिंसेची शिकार बनावं लागलं. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, याबाबत तपासानंतर आरोप निश्चित केले जातील. आरोपाबाबत सक्त कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबरोबरच अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाने इतर डे केअर सेंटरमधील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी सुरू केली आहे.