हृदयद्रावक! बाईक रेसिंगदरम्यान अपघात अन् १३ वर्षीय रायडर काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 22:48 IST2023-08-05T22:48:20+5:302023-08-05T22:48:38+5:30
Bike racer Shreyas Hareesh passes away : बाईक रेसिंगदरम्यान अपघात झाल्याने १३ वर्षीय रेसर श्रेयस हरीश याचा मृत्यू झाला.

हृदयद्रावक! बाईक रेसिंगदरम्यान अपघात अन् १३ वर्षीय रायडर काळाच्या पडद्याआड
बाईक रेसिंगदरम्यान अपघात झाल्याने १३ वर्षीय रेसर श्रेयस हरीश याचा मृत्यू झाला. अपघातात श्रेयस हरीश गंभीर जखमी झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने युवा रेसर काळाच्या पडद्याआड गेला. या दुर्देवी घटनेनंतर स्पर्धेचे आयोजक मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लबने शनिवार आणि रविवारची रेसिंग स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, बंगळुरू येथील श्रेयस हरीश या १३ वर्षीय रेसरचे निधन झाल्याने स्पर्धेला गालबोट लागले. मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिपच्या (INMRC) राउंड ३ मध्ये रेसिंग करताना त्याचा अपघात झाला. मृत श्रेयस हा बंगळुरूमधील केन्सरी स्कूलचा विद्यार्थी असून तो एक रेसर देखील होता. श्रेयसने राष्ट्रीय स्तरावर टीव्हीएस वन-मेक चॅम्पियनशिपसह अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.
१३ वर्षीय रेसर काळाड्या पडद्याआड
खरं तर श्रेयस हरीश शनिवारी सकाळी पोल पोझिशनसाठी पात्र ठरला होता. आयोजकांनी शनिवारी प्रसिद्धीपत्रक जारी करून श्रेयस टर्न-१ मधून बाहेर पडताना दुचाकीवरून पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले. अपघाताचे वृत्त समोर येतात स्पर्धा ताबडतोब थांबवण्यात आली आणि जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. पण, इस्पितळात आणल्यानंतर डॉक्टरांनी श्रेयसला मृत घोषित केले.