विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 06:59 IST2025-09-25T06:58:52+5:302025-09-25T06:59:29+5:30
फैझल हा अफगाणिस्तानच्या कुंदूजचा रहिवासी. त्याला जायचं होतं तेहरानला. काबूल विमानतळावर जे प्रवासी आत जात होते, त्यांच्या मागे लपून आधी त्यानं विमानतळावर प्रवेश मिळवला आणि नंतर लँडिंग गीअरच्या व्हील-वेलमध्ये लपला

विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
रविवारी सकाळी साडेदहाची वेळ. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी वेवर एक तेरा वर्षांचा मुलगा घुटमळत होता. गोंधळलेला, बावरलेला, घाबरलेला. अंगातला कुर्ता-पायजमा पूर्णपणे फाटलेला. अनवाणी पायांना टराटर फाेड आलेले. काबूलवरून नुकत्याच आलेल्या काम एअर RQ 4401 या विमानातून तो उतरला होता.
विमान लँड झाल्याबरोबर प्रवाशांची विमानातून उतरण्याची लगबग सुरू झाली. ग्राउंड स्टाफही तिथे हजर झाला. तेवढ्यात एका कर्मचाऱ्याला हा मुलगा दिसला. विमानातून सारेच प्रवासी तर अजून उतरायचे होते, मग हा इथे विमानाजवळ, तेही एकटाच कसा?.. त्यांनी या मुलाची चौकशी सुरू केली; पण त्याला हिंदी, इंग्रजी भाषा येत नव्हती. कर्मचाऱ्यांनी मग विमानातील अफगाण क्रूला त्याच्याशी संवाद साधण्यासाठी बोलावलं. त्यानंतर उघड झाली ती हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी..
या मुलाचं नाव फैझल. मृत्यूशी झुंज देत तब्बल दीड तासाच्या प्रवासात विमानाच्या चाकाजवळील लँडिंग गीअरच्या व्हील-वेलमध्ये लपून तो भारतात आला होता; पण मुळात पासपोर्ट, व्हिसा, इतर महत्त्वाची कोणतीही कागदपत्रे नसताना फैझल काबूल विमानतळावर पोहोचला कसा, सगळ्यांची नजर चुकवून तो लँडिंग गीअरच्या व्हील-वेलमध्ये घुसला कसा? आणि मृत्यूला चकवा देत जिवंतपणी भारतात पोहोचला कसा?.. कारण या प्रवासात विमानानं तब्बल तीस ते चाळीस हजार फूट उंची गाठली होती. तापमान तब्बल उणे ५० अंश सेल्सिअस इतकं होतं. चाकांच्या मोकळ्या भागात जिथे घुसणंही अवघड तिथे हा मुलगा बसला कसा? जिथे श्वास घेणंही अवघड तिथे विनाऑक्सिजन तब्बल दीड तास तो लपून बसला कसा? शिवाय सोबतीला कानाचे पडदे अक्षरश: फाडून टाकणारा इंजिनचा दणदणाटी आवाज.. अशा परिस्थितीत कोणीही जिवंत राहणंच अवघड; पण फैझलचं दैव बलवत्तर होतं हेच खरं!
फैझल हा अफगाणिस्तानच्या कुंदूजचा रहिवासी. त्याला जायचं होतं तेहरानला. काबूल विमानतळावर जे प्रवासी आत जात होते, त्यांच्या मागे लपून आधी त्यानं विमानतळावर प्रवेश मिळवला आणि नंतर लँडिंग गीअरच्या व्हील-वेलमध्ये लपला. विमान उड्डाणाच्या वेळी टायरच्या उष्णतेमुळे त्याचे बूट वितळले, पण विमान आकाशात उंच झेपावल्यावर तापमान तब्बल उणे ५० अंश सेल्सिअस झालं. थंडीपासून वाचण्यासाठी त्यानं आपल्याकडच्या ‘फेरन’मध्ये (अफगाणी आकीट) स्वत:ला गुंडाळून घेतलं! मुलगा लहान असल्यानं भारतीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा नोंदवला नाही. अफगाण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याच विमानानं ‘सीटवर बसवून’ त्याला पुन्हा काबूलला पाठवलं!
अशाच प्रवासात जानेवारी २०२४ मध्ये डॉमिनिकन रिपब्लिकहून फ्लोरिडाकडे जाणाऱ्या विमानाच्या लँडिंग गीअरमध्ये दोन मृतदेह सापडले होते. डिसेंबर २०२३ मध्ये अल्जेरियाचा एक तरुण पॅरिसला जाताना वाचला, पण त्याची परिस्थिती गंभीर होती. २०२१ मध्ये ग्वांटेमालाचा एक जण मायामीकडे जाताना चाकाजवळ चार तास लपूनही जिवंत राहिला होता. १९४७ ते २०२१ दरम्यान १३२ लोकांपैकी ७७ टक्के लोकांचा अशा प्रवाशात मृत्यू झाला. भारतात १९९६ मध्ये पंजाबमधील प्रदीप आणि विजय सैनी या दोन भावांनी असाच प्रयत्न केला, पण त्यात विजयचा मृत्यू झाला होता.